केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या ७ व्या वेतन आयोगानुसार पगार वाढ होण्याची अद्याप वाट पाहत आहेत. मात्र, तत्पूर्वी मोदी सरकारने ३ लाख ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या मुळ वेतनात वाढ करण्यात आली आहे. वेतनवाढीसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी नुकतेच देशव्यापी आंदोलन केले होते. त्यामुळे देशभरातील टपाल सेवेवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या ३ लाख टपाल कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे सरकारी तिजोरीवर १२५७.७५ कोटींचा भार पडणार आहे. या मुळवेतनवाढीमुळे ज्या ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांना रु. २२९५ महिन्याला पगार मिळत होता त्यांचा पगार थेट १०,००० रुपये होणार आहे. तसेच ज्यांना २,७७५ रुपये महिन्याला मिळतात त्यांचा पगार १२,५०० रुपये इतका होणार आहे. तर ज्यांचा पगार ४,११५ रुपये प्रति महिना असेल त्यांना यापुढे १४,५०० रुपये इतका पगार मिळणार आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली.

सिन्हा म्हणाले, १ जानेवारी २०१६ पासून प्रस्तावित ही पगार वाढ थकबाकीसह लागू होणार आहे. तसेच मुळ वेतनावर भत्तेही मिळणार आहेत. त्याचबरोबर यंदा पहिल्यांदाच टपाल कर्मचाऱ्यांच्या कामानुसार धोका आणि त्रास भत्ता ही देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपाअंतर्गत सेवेत सामावूनही घेण्यात येणार आहे.

देशात सुमारे २.६ लाख ग्रामीण टपाल सेवक काम करतात. हे कर्मचारी यापूर्वी तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. एकूणच या नव्या पगारवाढीमुळे ग्रामीण टपाल सेवकांचे कमीत कमी वेतन हे १०,००० रुपये असेल तर जास्तीत जास्त वेतन ३५,४८० रुपये इतके असणार आहे.