पगारी नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधीतील (इपीएफ) गुंतवणूक ही सर्वांत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. या निधीत गुंतवलेल्या पैशांवर फक्त चांगले व्याजच मिळते असे नव्हे तर आपला प्राप्तिकर वाचवण्यातही हा निधी महत्वाची भूमिका निभावतो. पण याचा लाभ बंद खात्यांना म्हणजे अॅक्टिव्ह नसलेल्या खात्यांना मिळत नव्हता. पण आता या खातेधारकांसाठीही एक खूशखबर आहे. गेल्या तीन वर्षांपासून अॅक्टिव्ह नसलेल्या खातेधारकांनाही आता व्याज मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इपीएफओने अॅक्टिव्ह नसलेल्या खात्यांवर व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी इपीएफमध्ये पैसे गुंतवावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे इपीएफओ आयुक्त व्ही.पी.जॉय यांनी सांगितले. जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर तीन वर्षांनंतरही पैसे काढले नसतील तर त्याला व्याज मिळणार नाही.

दरम्यान, मुदतीपूर्वी अटींवर पैसे काढण्याची मुभा इपीएफओने दिली आहे. तसेच जॉय म्हणाले, जेव्हा एखादा कर्मचारी आपली नोकरी बदलतो. तेव्हा त्याचे खाते बंद होते. त्यानंतर तो कर्मचारी पुन्हा नव्याने खाते उघडतो. आता आम्ही खाते उघडण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. खाते बंद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. पीएफ खाते हे एक स्थायी खाते आहे. कर्मचारी सामाजिक सुरक्षेसाठी एकच खाते कायम ठेवता येईल.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर कोणत्याही अर्जाविना त्याचे पैसे तीन दिवसांत हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. भविष्यात जर कोणाकडे आधार कार्ड किंवा योग्य ओळखपत्र असेल तर देशातील कोणत्याही ठिकाणी नोकरी बदलली तरी अर्ज न करता खाते हस्तांतरित केले जाईल. ही व्यवस्था लवकरच लागू होईल, असे जॉय यांनी सांगितले होते.