चातकाप्रमाणे सर्व भारतीय ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, तो मान्सून येत्या ४-५ दिवसांत केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. त्याचबरोबर यंदाच्यावर्षी देशात सरासरीच्या १०४ ते ११० टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. जूनच्या पूर्वार्धात पाऊसचे प्रमाण कमी राहिले तरी उत्तरार्धात चांगला पाऊस होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
सुधारित अंदाजामध्ये मध्य भारतात सरासरीच्या ११३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य भारताच्या तुलनेत ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात कमी पाऊस पडू शकतो, असेही हवामान विभागाने सुधारित अंदाजामध्ये म्हटले आहे. देशभरात जुलैमध्ये सरासरीच्या १०७ टक्के तर ऑगस्टमध्ये १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजामध्ये १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यावेळी विभागनिहाय आणि महिन्यांनुसार किती पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तविण्यात आला नव्हता.