कार आणि बाइकची चावी हरवल्याचं तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. यांची चावी हरवली तर ती शोधणंही तसं कठीणच असतं, पण गरज पडली तर आपल्याकडे त्यासाठी काही ना काहीतरी पर्याय उपलब्ध असतो. पण तुम्ही कधी मालगाडीच्या इंजिनाची चावी हरवल्याचं ऐकलं आहे का ? हरियणामधील बावल रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली आहे.

मालगाडीच्या इंजिनाची चावी हरवल्याने सकाळी रेल्वे स्थानकावर पोहोचलेली ट्रेन संध्याकाळपर्यंत तिथेच उभी होती. बुधवारी सकाळी कोळसा घेऊन आलेली मालगाडी बावल रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. स्टाफ बदली झाल्यामुळे चावी हरवली, ज्याचा भुर्दंड लोकांनाही सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी मथुराहून रेवाडीला चालली होती. बावल रेल्वे स्थानकावर चालक आणि गार्डची शिफ्ट बदलणार होती. ड्यूटी बदलली असल्या कारणाने चालक आणि गार्ड आपल्या घरी निघून गेले. रेवाडीहून पोहोचलेल्या नव्या चालक आणि गार्डने स्टेशन मास्तरकडे इंजिनाची चावी मागितल्यानंतर नसल्याचं सांगण्यात आलं. चालक आणि गार्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांचा फोन लागत नव्हता.

खूप वेळ शोध घेऊनही चावी मिळाली नाही. यामुळे आठ तास मालगाडी एकाच ठिकाणी उभी होती. स्टेशनजवळच फाटक असल्या कारणाने तेही बंद ठेवण्यात आलं होतं, ज्यामुळे गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. स्टेशन मास्तरने दिलेल्या माहितीनुसार, चावी मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर जयपूरहून दुसरी चावी मागवण्यात आली. दरम्यान फाटक उघडत नसल्याने लोकांनीही पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळ गाठलं.