गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात आता पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. गुडविन ज्वेलर्सच्या मालकांची संपत्ती आता जप्त करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुडविनच्या मालकांची मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. तसंच त्यांचे दोन फ्लॅटही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

गुडविनचा मालक सुनिल कुमार याच्या नावावर हे मर्सिडीज गाडी रजिस्टर आहे. तसंच एका मोठ्या गुंतवणुकदाराला गॅरंटी म्हणून देण्यात आली होती. परंतु फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचे पलावा सिटीमधील दोन फ्लॅटही सील केले आहेत. दरम्यान, आता गुडविन ज्वेलर्सच्या मालकांच्या संपत्तीच्या विक्रीतून आपले पैसे परत मिळतील का याकडे गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं आहे.

मुदत ठेवी आणि भिशीच्या माध्यमातून १६ टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होऊ लागला असून डोंबिवली, ठाणे आणि अंबरनाथ शहरामधील विविध पोलीस ठाण्यांत गुडविन ज्वेलर्सच्या मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ामध्ये ६८ गुंतवणूकदारांची १ कोटी ६७ लाख ३३ हजार ६६० तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५२ गुंतवणूकदारांची २ कोटी २१ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये सुनीलकुमार अकराकरण, सुधीरकुमार अकराकरण यांनी गुडविन ज्वेलर्सची दुकाने सुरू केली होती. या दुकानांच्या माध्यमातून त्यांनी विविध योजना सुरू केल्या होत्या. एका वर्षांच्या ठेवीवर १६ टक्के व्याज, दोन वर्षांच्या ठेवीवर १८ टक्के व्याज तर पाच वर्षांच्या ठेवीवर दामदुप्पट तसेच एक वर्षे भिशी भरली तर पुढील एका महिन्याचे पैसे गुडविन ज्वेलर्स भरणार आणि त्यानंतर दागिने किंवा १३ महिन्यांचे पैसे दिले जातील. त्याचप्रमाणे दोन वर्षे भिशी भरली तर पुढील चार महिन्यांचे पैसे गुडविन ज्वेलर्स भरेल, अशा स्वरूपाच्या या योजना होत्या. या योजनांच्या आमिषांना बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतविले होते. आठ दिवसांपूर्वी शहरातील गुडविन ज्वेलर्सची दुकाने बंद करण्यात आली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही दुकाने बंद असल्यामुळे गुंतवणूकदारांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस दोघे मालक दुकाने बंद करून फरार झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. दरम्यान, आपल्याकडून ५० कोटींची खंडणी मागितल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थळी असल्याचे गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी स्पष्ट केले आहे. तसंच ग्राहकांचे पैसे परत करण्याचा शब्दही त्यांच्याकडून देण्यात आला होता.