गुगलच्या सीईओपदी विराजमान झालेल्या भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई यांनी गुरूवारी यू-ट्युबवरील व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. बऱ्याच काळापासून भारत परदेशातील तंत्रज्ञान कंपन्यांची कुशल मनुष्यबळाची गरज पुरवत आला आहे. परंतु, सध्या भारतातही अंतर्गत क्रांती सुरू असून त्याचा १२१ कोटी भारतीय जनतेला फायदा होणार असल्याचे पिचाई यांनी व्हिडिओत म्हटले.
पिचाई यांनी सिलिकॉन व्हॅलीत मोदींचे स्वागत करताना गुगलमधील कर्मचारी आणि येथील संपूर्ण भारतीय समाज त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. भारत आणि सिलिकॉन व्हॅलीत घट्ट नाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील तंत्रज्ञान कंपन्यांसाठी भारत मनुष्यबळाचा मोठा निर्यातदार राहिला आहे. भारतातील आयआयटी आणि अन्य संस्थांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी तयार केलेल्या उत्पादनांमुळे जागतिक क्रांतीला चालना मिळाली आहे. मात्र, सध्या भारतही क्रांतीच्या अवस्थेत असल्याचे पिचाई यांनी सांगितले. या सगळ्याचा देशाला विशेष करून ग्रामीण भारताला खूप मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सॅन जोस येथील कार्यक्रमात भारतीय पंतप्रधान काय बोलणार, याकडे आम्हा सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्हाला आशा आहे की, त्यांची ही भेट सिलिकॉन व्हॅली आणि भारतातील लोकांना उर्जा देणारी ठरेल. त्यामुळे दोघांमधील नात्याला नवचैतन्य आणि बळकटी मिळेल, असेही पिचाई यांनी सांगितले.