सुंदर पिचाई यांचा मुस्लिमांना पाठिंबा
मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश देण्यावर बंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर कार्पोरेट जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी मुस्लिमांना पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये विखुरलेल्या मुस्लीम आणि अल्पसंख्याकांना समान संधी मिळण्यासाठी आपल्याला त्यांच्यामागे उभे राहावे लागेल, असे मत पिचाई यांनी व्यक्त केले.
मुस्लिमांबाबत सध्या पूर्वग्रहदूषित वातावरण आहे. ट्रम्प यांनी त्याविषयी जाहीर विधान करताना मुस्लीमद्वेष व्यक्त केला आहे.
यासंदर्भात बोलताना पिचाई म्हणाले, अशा वातावरणात स्वत:च्या मूल्यांचा पराभव होऊ देऊ नका. २२ वर्षांपूर्वी मी भारतातून अमेरिकेत आलो. त्या वेळी येथील विद्यापीठात प्रवेश मिळविताना मी सुदैवी ठरलो; परंतु त्यानंतर अनेक संधीची दारे ही अपार कष्टानेच उघडत गेली. माझे जीवन इथे घडले. कुटुंब वाढले. हा देश माझ्या अस्तित्वाचाच एक भाग असल्याची माझी घट्ट भावना आहे. जशी ती भारतात असताना होती, असे सुंदर यांनी एका ‘पोस्ट’द्वारे स्पष्ट केले आहे.