वर्षभर जगभरातील कोटय़वधी लोकांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या गुगलचा आज १७ वा वाढदिवस असून जगभरातून लाखो गुगलप्रेमींचा शुभेच्छांचा वर्षांव गुगलवर होतो आहे.
तारुण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गुगलने बघताबघता मोठा पल्ला गाठत संगणकप्रेमी आणि मोबाईलधारकांमध्ये महत्त्वाची जागा निर्माण केली. अशी कोणतीही माहिती असू शकत नाही की जी गुगल या सर्च इंजिनवर नाही. माहितीचा महास्फोट घडवणाऱ्या गुगलला दोनच गोष्टी मागे खेचू शकतात. एक म्हणजे वीज आणि दुसरी सिग्नल. या दोन्ही गोष्टी उपलब्ध असल्यातर गुगल सुसाट वेगाने धावते. त्यामुळेच गुगल नसते तर प्रगतीची वाट खुंटली असती, असे आजची पिढी उगीच म्हणत नाही.
गुगलच्या १७व्या वाढदिवशी स्वत:चे डुडलही बदलवले आहे. त्यात किबोर्डसह प्लास्टिकचा पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे ‘जी’, दोन फुगे म्हणजे ‘दोनदा ओ’, सीपीयूचा आकार परत ‘जी’सारखा, त्याच्यापुढे ‘एल’च्या आकाराचा लावा लॅम्प आणि मेजलाच ‘ई’ सारखा आकार देण्यात आल्याने. गुगलचे हे नवीन डुडल लक्षवेधी आहे.