जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलची अनोखी डुडल प्रश्नावली
इंटरनेटच्या जालातील गुगल या बलाढ्य सर्च इंजिनने बुधवारी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. डुडल सादर करण्यातील नाविण्यपूर्णता कायम राखत गुगलने यावेळी डुडलला प्रश्नावलीचे रुप दिले आहे. वसुंधरा दिनाचे स्मरण घडविण्याच्या हेतून तुम्ही कोणत्या प्रकारचे प्राणी आहात? या प्रश्नाखाली मनोरंजानाचा मुलामा देऊन गुगलने एक छोटीशी प्रश्नावली सादर केली आहे.
गुगलचे होम पेज उघडताच आपल्याला गुगलच्या इंग्रजी अक्षरांमध्ये फिरणारी पृथ्वी दिसते. तसेच या अक्षरांमधून निसर्गदर्शन देखील घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या डुडलवर क्‍लिक केल्यास नेटिझन्ससमोर “तुम्ही कोणत्या प्रकारचे प्राणी आहात‘ याबाबतची छोटीशी प्रश्‍नावली सादर होते. या प्रश्नावलीला शास्त्रीय आधार असून शंभर टक्के अचूक असल्याचा दावा गुगल डुडलच्या टीमने केला आहे.
जागतिक वसुंधरा दिन सर्वात पहिल्यांदा १९७० साली साजरा केला गेला होता. आणि सध्या ‘अर्थ डे नेटवर्क’च्या विद्यमाने जगभरातील तब्बल १९२ देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.