News Flash

सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त विशेष डूडल

भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत गुगलने गुरुवारी विशेष डूडल तयार केले होते.

| February 14, 2014 02:44 am

भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत गुगलने गुरुवारी विशेष डूडल तयार केले होते. गुगलमधील दुसऱ्या ‘ओ’ या अक्षराच्या जागी सरोजिनी यांचे रेखाचित्र तर त्यातील ‘एल’ या अक्षराच्या जागी त्यांच्या काव्यलेखनाचे प्रतीक म्हणून ‘लेखणी’ यांच्या मदतीने हे डूडल सजविण्यात आले आहे. मात्र यामुळे गेल्या काही दिवसांत गुगलच्या डूडलवरील भारतीय ‘मुद्रां’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
‘भारताच्या कोकीळा’ या नावाने सरोजिनी नायडू ओळखल्या जातात. १३ फेब्रुवारी, १८७९ हा त्यांचा जन्मदिन. हैद्राबाद येथील चट्टोपाध्याय यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मद्रास इलाख्यात त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी तत्कालीन समाजमनाचा विरोध झुगारीत डॉ. गोविंदराजुलू नायडू यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. भारतात १८९६ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांचा ‘कैसर ए हिंद’ पुरस्कार देत गौरवही केला होता. स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही नायडू यांना मिळाला होता. त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल पदही भूषविले होते. २ मार्च, १९४९ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गुरुवारी त्यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली.
डूडलवर भारताची वाढती मुद्रा
ऑनलाइन विश्वात नेटिझन्सच्या जागतिक ‘मूड’चे प्रतिबिंब गुगलच्या डूडलवर उमटलेले पाहावयास मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत डूडल हे जणू ‘सांस्कृतिक मानबिंदू प्रतीक’ ठरू लागले होते. पहिले डूडल १९९८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आजवर ७०० डूडल प्रसिद्ध झाली. अनेकदा विनोदी, कल्पनाप्रधान, संवादात्मक अशी विविध डूडल्स आजवर तयार करण्यात आली होती. याआधी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गुगलने विशेष डूडल आपल्या होमपेजवर ठेवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 2:44 am

Web Title: google doodle celebrates sarojini naidus 135th birthday
टॅग : Google Doodle
Next Stories
1 बेनीप्रसाद वर्मा यांचा पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न -जावडेकर
2 कराचीत पोलीस बसगाडीवर आत्मघातकी हल्ल्यात १३ ठार
3 कुपोषणाच्या उच्चाटनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न -मोदी
Just Now!
X