21 September 2020

News Flash

Steve Irwin: ‘क्रॉकडाइल हंटर’ स्टीव्ह आयर्विनसाठी गुगलचे खास डुडल, जाणून घ्या स्टीव्हसंदर्भातील ३० भन्नाट गोष्टी

सहाव्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून त्याला अजगर देण्यात आला होता

Steve Irwin स्टीव्ह आयर्विनसाठी खास डुडल

Google Doodle Steve Irwin गुगलने आज ऑस्ट्रेलियाचा ‘क्रॉकडाइल हंटर’ स्टीव्ह आयर्विन याच्या जयंतीनिमित्त डुडलच्या माध्यमातून त्याला सलाम केला आहे. अक्राळ-विक्राळ मगरी, विषारी साप यांना एकीकडे लीलया हाताळताना प्रेक्षकांशी हसतखेळत संवाद साधणाऱ्या स्टीव्हची आज ५७ वी जयंती. ‘द क्रॉकडाइल हंटर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टीव्हला २००६ साली स्टिंगरे माशाच्या शेपटीचा तडाखा मर्मस्थानी बसल्याने आणि त्या शेपटीतील विष शरीरात भिनल्याने अलीकडेच मरण पावला. त्याच्या निधनामुळे अवघे जग हळहळले होते. आज याच स्टीव्हला गुगलने डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. १९९५ ते २००५ या काळामध्ये जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे स्टीव्ह घराघरात ओळखीचा चेहरा झाला होता. आज त्याच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या ३० खास गोष्टी…

१) स्टीव्ह आयर्विन नावाने तो लोकप्रिय असला तरी त्याचे खरे नाव स्टीफन रॉबर्ट आयर्विन असे होते

२) त्याचा जन्म मेलबर्नजवळील एसिडोन या लहानच्या उपनगरामध्ये २२ फेब्रुवारी १९६२ ला झाला होता. त्याचा जन्म त्याच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशीच झाला होता.

३) त्याचे वडील आयरिश होते. ते वन्यजीव तज्ज्ञ होते आणि त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात विशेष स्वारस्य होते. तर आई वन्यजीव पुनर्वसन तज्ज्ञ असल्याने प्राणी प्रेमाचा वरसा त्याला घरातूनच मिळाला होता.

४) आयर्विन कुटुंब एसिडोनमधून क्विन्सलॅण्ड शहरामध्ये राहण्यास आले तेव्हा आयर्विन दांम्पत्याने क्विन्सलॅण्ड रेप्टाइल अॅण्ड फॉना पार्क नावाने एक छोटे प्राणीसंग्रहालय सुरु केले. स्टीव्हचे बालपण या प्राणीसंग्रहालयामध्ये मगरी आणि सापांच्या सानिध्यात गेले.

५) १९९१ साली स्टीव्ह आपली पत्नी टेरी रेयन्सला पाहिल्यांदा भेटला. पाहता क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेय. टेरी ही अमेरिकन निसर्ग संवर्धन तज्ज्ञ होती.

६) भेटीनंतर अवघ्या एका वर्षात म्हणजे १९९२ रोजी स्टीव्ह आणि टेरी यांनी लग्न केले.

७) त्यांना दोन मुलं आङेत. मुलगी बेंडी सू आयर्विनचा जन्म २४ जुलै १९९८ ला झाला तर मुलगा रॉबर्ट आयर्विनचा जन्म १ डिसेंबर २००३ ला झाला. सध्या हे दोघे आपल्या आईच्या मदतीने स्टीव्हचा वारसा पुढे चालवत आहेत.

८) लग्न झालेलं असतानाही यांनी ऑस्ट्रेलियन परंपरेप्रमाणे कधीच वेडिंग रिंग म्हणजेच लग्नाची अंगठी घातली नाही. या अंगठीमुळे प्राण्यांना त्रास होईल असं त्यांच मतं होतं.

९) लग्नानंतर हनिमूनला गेलेले हे दोघे प्राणी प्रेमी मगरींचा पाठलाग करुन त्यांची नोंद करत होते. याच वेळेस शूट करण्यात आलेला व्हिडीओ नंतर ‘द क्रोकोडाइल हंटर’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचा पहिला भाग ठरला.

१०) ‘द क्रोकोडाइल हंटर’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली.

११) ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले.

१२) या कार्यक्रमाचा शेटवचा भाग तीन तासांचा होता. यामध्ये स्टीव्ह जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मगरींचा पाठलाग करताना दिसला.

१३) स्टीव्हच्या नावाने काही कासवांच्या प्रजातींचे नामकरण करण्यात आले आहे. यापैकी पहिली प्रजाती ठरली ती एसलिया आयर्विन.

१४) मॅक्सिकोमध्ये दोन स्कुबा डायव्हर्सबरोबर स्टीव्ह एका माहितीपटावर काम करत असताना एक अपघात झाला ज्यामध्ये एका स्कुबा डायव्हरचा मृत्यू झाला होता.

१५) स्टीव्हला सहव्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी एक अजगर भेट दिला होता. तर वयाच्या नवव्या वर्षापासून तो मगरींना हाताळणे शिकला होता.

१६) मगरींबरोबर सहज खेळणारा स्टीव्ह पोपटांना खूप घाबरायचा.

१७) स्टीव्हच्या मृत्यूनंतर मे २००७ मध्ये रेवांडा येथील प्राणीसंग्रहालयातील एका गोरिलाला त्याचे नाव देण्यात आले.

१८) २००९ मध्ये सापडलेल्या गोगलगायीच्या नव्या प्रजातीलाही स्टीव्हचे नाव देण्यात आले.

१९) २२ जून २०१७ मध्ये स्टीव्हच्या नावाचा हॉलिवूडमधील जगप्रसिद्ध वॉक ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.

२०) अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांप्रमाणे स्टीव्हला क्रिकेटचे प्रचंड वेड होते.

२१) ४ सप्टेंबर २००६ रोजी स्टीव्हचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले.

२२) ‘ओशन्स डेडलीएस्ट’ या माहितीपटाच्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

२३) चित्रिकरणासाठी समुद्रात उतरलेल्या स्टीव्हच्या छातीवर स्टिंगरे माशाच्या शेपटीचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाला.

२४) त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली म्हणून सिडनीतील जगप्रसिद्ध पुलावरील ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर फडकवण्यात आला.

२५) ऑस्ट्रेलियन प्राणीसंग्रहालयामध्येच स्टीव्हला दफन करण्यात आले.

२६) मात्र या प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना ठिकाणाला भेट देता येत नाही.

२७) स्टीव्हचा मृत्यू झाला तेव्हा पंतप्रधान हॉवर्ड आणि क्विन्सलॅण्डचे प्रांताच्या प्रमुखांनी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली.

२८) मात्र स्टीव्हच्या कुटुंबाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायला नकार दिला. ”मला एक सामान्य माणूस म्हणूनच वागणूक मिळावी’ अशी स्टीव्हची इच्छा असल्याने कुटुंबाने हा निर्णय घेतला.

२९) २० सप्टेंबर रोजी स्टीव्हला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी साडेपाच हजार नागरिकांनी उपस्थिती लावली.

३०) ऑस्ट्रेलियन सरकारने स्टीव्हच्या सन्मानार्थ देशातील एका प्रमुख रस्त्याला आणि जहाजाला त्याचे नाव दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 9:25 am

Web Title: google doodle marks crocodile hunter steve irwins birthday read 30 fascinating facts about him
Next Stories
1 UN सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध, चीनने भारताला समर्थन दिल्याने पाकिस्तानची कोंडी
2 इम्रान खान म्हणजे पाकिस्तानी सैनाचा पोपट, घटस्फोटीत पत्नीचा हल्लाबोल
3 सोशल मीडियावर लष्कराविरुद्ध वक्तव्य, तीन काश्मिरी मुलींविरुद्ध कारवाई
Just Now!
X