गुगल आणि भारतीय रेल्वेची दूरसंचार शाखा असलेली रेलटेल यांच्या सहकार्याने देशातील आणखी नऊ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरू झाली आहे. यामुळे जलदगती इंटरनेट उपलब्ध असलेल्या रेल्वे स्थानकांची संख्या दहावर जाणार असून तिचा फायदा सुमारे १५ लाख प्रवाशांना होणे अपेक्षित आहे.
सध्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर गुगल- रेलटेलची मोफत वायफाय सेवा उपलब्ध आहे. ती गेल्या जानेवारीत सुरू करण्यात आली
होती.
शुक्रवारपासून पुणे, भुवनेश्वर, भोपाळ, रांची, रायपूर, विजयवाडा, काचीगुडा (हैदराबाद), एर्नाकुलम जंक्षन (कोची) आणि विशाखापट्टणम या स्थानकांवर प्रवाशांना स्मार्टफोनच्या साहाय्याने मोफत नेटवर्क मिळवणे शक्य होणार आहे.
भुवनेश्वर स्थानकावरील वायफाय सेवेचे औपचारिक उद्घाटन रविवारी होणार असून जयपूर, उज्जन व अलाहाबाद येथे ही सुविधा पुढील आठवडय़ात सुरू होईल, असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इंटरनेटचे जाळे देशातील १० महत्त्वाच्या स्थानकांवर उपलब्ध होत असून, या जाळ्याचा काही लहान स्थानकांवरही विस्तार करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत, असे गुगलचे भारतातील प्रकल्प प्रमुख गुलझार आझाद यांनी सांगितले.