01 March 2021

News Flash

सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका महाश्वेतादेवींना गुगलचे डुडलद्वारे अभिवादन

महान लेखिकेला गुगलची मानवंदना

ज्येष्ठ लेखिका महाश्वेतादेवींच्या जयंतीनिमित्त गुगलचे डुडलद्वारे अभिवादन

साहित्यक्षेत्रात आपल्या लेखनशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखिका म्हणजे महाश्वेतादेवी. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगल या सर्च इंजिनने डुडलद्वारे महाश्वेतादेवींना अभिवादन केले आहे. १४ जानेवारी १९२६ रोजी महाश्वेतादेवींचा जन्म आता बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव धरित्री देवी आणि वडिलांचे नाव मनिष घटक असे होते. हे दोघेही साहित्यिक होते. त्यांच्याकडूनच महाश्वेतादेवींना लेखनाचे धडे मिळले. भारताची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आले. महाश्वेता देवी यांनी विश्वभारती विद्यापीठ आणि शांतीनिकेतन मधून इंग्रजी विषय घेऊन बी.ए. केले. तर कोलकाता विद्यापीठातून एम. ए. केले. शिक्षिका आणि पत्रकार म्हणून महाश्वेतादेवींनी दीर्घकाळ काम केले.

लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड होती. त्यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात काही लघूकथांद्वारे केली. १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनाचा महाश्वेता देवींच्या आयुष्यावर प्रभाव पडला. त्यानंतर १९४३ मध्ये दुष्काळ पडला. ज्या दरम्यान समाजसेवेचे व्रत महाश्वेतादेवींनी हाती घेतले ते अखेर पर्यंत सोडले नाही. १९४७ मध्ये त्यांचा विवाह प्रख्यात रंगकर्मी विजन भट्टाचार्य यांच्याशी झाला. महाश्वेता देवी यांचे पहिले पुस्तक १९५६ मध्ये प्रकाशित झाले. ‘झांसी की रानी’ असे या पुस्तकाचे नाव होते. रुदाली, हजार चौरासी की माँ, माटी माई या त्यांच्या पुस्तकांवर सिनेमांचीही निर्मिती करण्यात आली. ‘अरण्येर अधिकार’

या पुस्तकातून महाश्वेतादेवी यांनी समाजातील शोषण आणि त्यावर होणारा विद्रोह यावर लिखाण केले. बिरसा मुंडा येथे ब्रिटिश काळात झालेल्या संघर्षाचे वर्णन या पुस्तकात होते. या पुस्तकासाठी त्यांना १९७९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आपल्या लेखनाने समाजातील अन्यायावर भाष्य करणाऱ्या आणि शोषितांचे दुःख  मांडणाऱ्या महाश्वेतादेवी यांनी १०० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांचे समाजकार्यही अविरतपणे सुरुच होते. हिंदी साहित्य, बंगाली साहित्यविश्वात त्यांची कारकीर्द अजरामर ठरली.  महाश्वेतादेवींची आज जयंती आहे. हेच औचित्य साधून गुगल या जगप्रसिद्ध सर्च इंजिनने त्यांना डुडलद्वारे अभिवादन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 10:20 am

Web Title: google remembers mahasweta devi on her birth anniversary through a doodle
Next Stories
1 अणुकरारातील बदलास इराणचा नकार
2 केंद्रीय मंत्र्यांनीही निर्भयपणे बोलावे
3 न्याय, न्यायपालिकेच्या हितासाठीच हे पाऊल उचलले – न्या. जोसेफ
Just Now!
X