काही दिवसांपासून उत्तर प्रदेश गुन्हेगारीच्या घटनेनं चर्चेत आहे. पत्रकारांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेपासून उत्तर प्रदेशातील हत्याचं सत्र सुरूच असून, मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली म्हणून आरोपीनं मुलीच्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कन्नोज जिल्ह्यातील छिबरामऊ येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.

कन्नोज जिल्ह्यातील छिबरामऊ क्षेत्रात येणाऱ्या चिलमलैया गावात ही घटना घडली. ५० वर्षीय रणवीर यांचा पाणी भरण्यावरून गावातीलच श्याम लाल यांच्यासोबत जुना वाद आहे. या जुन्या वादातूनच आरोपी श्याम लालनं रणवीर यांच्या मुलीची छेडछाड केली. याप्रकरणी रणवीर यांनी पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली होती.

रणवीर यांनी पोलिसांत तक्रार केल्याचं कळल्यानंतर श्याम लाल यांनी कुऱ्हाडीनं रणवीर यांच्या हल्ला केला. वडिलांवर कुऱ्हाडीनं हल्ला करत असल्याचं बघून रणवीर यांच्या मुली त्यांना वाचवण्यासाठी धावल्या. मात्र, श्याम लाल यांनी मुलींवरही वार केले. या भयंकर घटनेत रणवीस यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रणवीर यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आरोपी श्याम लाल याला अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा- उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; लवून नमस्कार करण्यास नकार दिल्यानं दलित सरपंचाची हत्या

श्याम लाल वारंवार शिवीगाळ करायचा. त्याचबरोबर मुलींशीही असभ्य वर्तन करायचा, असं रणवीर यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. पीडित कुटुंबानं या प्रकरणात तक्रार केली होती. या घटनेसंदर्भात बोलताना पोलीस अधिकारी शिवकुमार थापा म्हणाले,”आरोपी श्याम लाल आणि रणवीर यांच्यात हातपंपावरून वाद होता. त्या वादातूनच श्याम लालनं रणवीर यांच्या एका मुलीचा विनयभंग केला होता. मयत रणवीर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर श्याम लालनं कुऱ्हाडीनं त्यांची हत्या केली.”

उत्तर प्रदेशात रविवारी एका अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याचबरोबर उच्च जातीतील आरोपींनी एका मागास जातीतील सरपंचाची हत्या केल्याचीही घटना घडली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे विरोधकांकडून भाजपा सरकारवर टीका होत आहे.