“दुनिया में रहना है तो काम कर प्यारे”, हे गाणं सर्वांनीच ऐकलं असेल आणि आपण सर्वच जण हेच तत्व आपल्या आयुष्यातही वापरत असतो. जगायचं असेल तर काम करावंच लागेल. हैद्राबादमधल्या एका आठ वर्षांच्या मुलालाही जगण्यासाठी काम करावं लागत आहे. त्याची कहाणी कळाल्यावर खरंच डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.

तिसऱ्या इयत्तेत शिकणारा गोपाल कृष्ण हा आपल्या परिवाराला जगवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण कऱण्यासाठी हैद्राबादमध्ये ई-रिक्षा चालवत आहे. आजतकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. या मुलाचे आई-वडील दोघेही दिव्यांग आहेत. तर त्याला दोन भाऊ आहेत. या सर्वांच्यात तो मोठा आहे. गेल्या आठवड्यात एका प्रवाशाला एक शाळेच्या गणवेशातला लहान मुलगा ई-रिक्षा चालवताना दिसला. तो आपल्या रिक्षात प्रवाश्यांना बसवून घेऊन चालला होता. या प्रवाशाने मुलाला पाहताच त्याला विचारलं तेव्हा त्याने आपली कहाणी सांगितली. आपल्या संपूर्ण परिवाराला पोसण्यासाठी आठ वर्षांच्या गोपाल कृष्णला हे काम करावं लागत आहे.

हेही वाचा – भारतीय चाहत्याने पायावर गोंदवून घेतला चेहरा; व्हिडीओ पाहून मिया खलिफा संतापली; म्हणाली…

गोपाल कृष्णने सांगितलं की अभ्यास करुन झाला की मी माझ्या आई-बाबांना ई-रिक्षामधून घेऊन जातो. मोठा मुलगा या नात्याने माझ्या कुटुंबाची मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. गोपाल कृष्णचे दिव्यांग आई-वडील हे चंद्रगिरी शहरात वेगवेगळ्या भागात भाजीपाला आणि किराणा माल विकतात.

या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की मी आणि माझी पत्नी दोघेही १०० टक्के दृष्टिहीन आहोत. आम्हाला तीन मुलं आहेत. आणि मोठा मुलगा त्याचा अभ्यास संपवून आम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतो. या दोघांची ही तिन्ही मुलं शारिरीकदृष्ट्या सुदृढ आहेत आणि हे दांपत्य आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घेत आहे. या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला असं वाटतं, सरकारने आमची पेन्शन वाढवायला हवी. सध्या आम्हाला पेन्शन म्हणून केवळ तीन हजार रुपये मिळतात.

गोपाल कृष्ण आपल्या आईबाबांना चंद्रगिरी शहरात सोडतो जिथे ते आपल्याकडच्या वस्तू विकतात. काही दिवसांपूर्वीच त्याला पोलिसांनी पकडलंही होतं आणि तो हे वाहन पुन्हा चालवणार नाही असं आश्वासन घेऊन त्याला सोडलंही होतं.