गोपाल सुब्रमण्यम यांनी जेटलींची डोकेदुखी वाढवली; केजरीवाल यांची भाजपवर टीका
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या स्टेडियम उभारणीत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी निष्पक्ष होईल, असे आश्वासन ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल सुब्रमण्यम यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले आहे. डीडीसीएच्या चौकशी अहवालात अरुण जेटली यांचे कुठेही नाव नसल्याने जेटली यांना दिलासा मिळाला होता. परंतु आता सुब्रमण्यम यांनी जेटलींविरोधात शस्त्र परजण्यास सुरुवात केली आहे. या चौकशीच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी सुब्रमण्यम यांनी केजरीवाल यांच्याकडे केली आहे.
अहवालात नाव नसतानादेखील जेटलींवर आरोप करणाऱ्या केजरीवाल व त्यांच्या नेत्यांनी जेटलींची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजप माफीसाठी जणू काही भिक्षा मागत आहे, अशा शब्दात केजरीवाल यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले. जेटली यांचे नाव अहवालात नसले तरी, त्यांच्याविरोधात ‘आप’ने हल्ला सुरूच ठेवला आहे.
अहवालात गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख आहे. परंतु तो कोणी केला याचा उल्लेख नाही. तेच समोर आणण्यासाठी आम्ही आयोग स्थापन केल्याचे केजरीवाल म्हणाले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीदेखील अहवालात नसल्याने कुणी निदरेष ठरत नसल्याचे म्हटले आहे. सिसोदिया यांनी बीसीसीआयच्या दक्षता समितीने दिलेल्या अहवालाचा हवाला दिला. या समितीच्या अहवालात डीडीसीएमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख करीत बीसीसीआयकडे ही संस्थाच बरखास्त करण्याची शिफारस केली होती, असे सिसोदिया म्हणाले. त्यांनी जेटली व भाजपवर प्रश्नांचा मारा केला. भाजप व जेटली चौकशीला का घाबरत आहेत, डीडीसीएच्या अंतर्गत अहवालात जेटलींचे नाव नसले तरी स्वतंत्र आयोगामार्फत चौकशीला जेटलींचा का विरोध आहे, गैरव्यवहार झाला तेव्हा जेटलीच अध्यक्ष होते, याच अहवालानुसार गैरव्यवहार झाला आहे- असे मुद्दे सिसोदिया यांनी उपस्थित केले. कुणीही कुणाला ‘क्लीन चिट’ दिलेली नाही. आता तर चौकशी सुरू झाली आहे, अशा शब्दात सिसोदिया यांनी सरकारचे इरादे स्पष्ट केले.

जेटलींच्या वाढदिवसावर ‘डीडीसीए’चे सावट
आम आदमी पक्षाच्या आरोपांमुळे घायाळ झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या ६२व्या वाढदिवसावर ‘डीडीसीए’तील आरोपांचे सावट राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण अशा अनौपचारिक प्रसंगीदेखील केंद्रीय मंत्री, भाजप नेते जेटलींपासून दूर राहिले. भाजपच्या ११, अशोका रस्त्यावर एक-दोन पोस्टर्स वगळता जेटलींच्या वाढदिवसाचा उत्साह कार्यकर्त्यांमध्येही नव्हता. पंतप्रधान मोदी वगळता अन्य एकाही केंद्रीय नेत्यांनी जेटलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे टाळले. जेटलींवर उपरोधिक शब्दात टीका करण्याची संधी भाजपमधून निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी सोडली नाही. ते म्हणाले की, डीडीसीएच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी मी केली आहे. मी कुणाचेही नाव घेतले नाही. वारंवार जेटलींचे नाव का येत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. मग त्यांचे नाव का येत आहे, असा उपरोधिक प्रश्न आझाद यांनी विचारला.