गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. परंतु शुजा या सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो असा दावाही त्यानं केला आहे.

शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आलं होतं, परंतु कपिल सिब्बलवगळता अन्य कुणी गेलेलं नाही. ही पत्रकार परिषद लंडनमध्ये सुरू असून शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे. याआधीही सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे.

दिल्लीमधल्या २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा शुजाचा दावा आहे. ही मशिन कशी हॅक करता येतील हे आपण दाखवू शकतो असंही त्यानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी ही प्रेस कॉन्फरन्स तसेच प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक बघत असून लवकरच आयोग आपलं म्हणणं मांडेल असं सांगण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.