24 November 2020

News Flash

मोदी सरकार म्हणजे ‘रामराज्य’, विरोधक नकारात्मक विचारसरणीचे; योगींचा टोला

"सरकारी कामांमध्ये सबका साथ सबका विकास हा भाव दिसून आला"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ (फाइल फोटो, फोटो : पीटीआय)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदी सरकारच्या काळातील कारभाराची तुलना रामराज्याशी केली आहे. “सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे सध्याच्या सरकारचे धोरण असून हीच रामराज्याची संकल्पना आहे. यामध्ये लोककल्याण हाच मुख्य भाव असतो. स्वार्थाला येथे जागा नसते. परमार्थ हाच मुख्य भाव असतो. ज्या दिवशी या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले त्याच दिवशी म्हणजेच २६ मे २०१४ रोजी या कार्याची सुरुवात झाली,” असं योगींनी म्हटलं आहे. त्याचवेळी त्यांनी विरोधक हे प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक विचार करणारे आहेत असंही म्हटलं आहे.

ही तर रामराज्याची कल्पना…

उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील गोरक्षनाथ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संम्मेलनामध्ये योगी आदित्यनाथ बोलत होते. “एखाद्या गोष्टीबद्दल दोन मतप्रवाह असतात. त्यापैकी एक सकारात्मक विचारसरणी असते. यामध्ये लोक कल्याणाचा विचार अधिक होतो. हीच प्रभू रामांची विचारसरणी होती. या विचारसरणीमध्ये सर्वांची सोबत घेऊन सर्वांना विकास घडवून आणण्याचा भाव असतो. हीच रामराज्याची संकल्पना आहे. यामध्ये लोककल्याण हाच मुख्य भाव असतो. स्वार्थाला येथे जागा नसते. परमार्थ हाच मुख्य भाव असतो. ज्या दिवशी या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले त्याच दिवशी म्हणजेच २६ मे २०१४ रोजी या कार्याची सुरुवात झाली,” असं योगी यावेळी म्हणाले. “सरकारने आपले कार्यक्रम आणि धोरणंही लोककल्याणाच्या हेतूने आखली आणि लोकांसमोर ठेवली. या धोरणांमध्ये जाती, प्रदेश, भाषा, धर्म यांच्या आधारावर भेदभाव करण्यात आला नाही,” असंही योगी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- भीम आर्मी, रवीश कुमार यांचं समर्थन करणारी १४ पेजेस बंद; भाजपाच्या तक्रारीनंतर फेसबुकची कारवाई

मोदी सरकार येण्यापूर्वी…

देशात मोदी सरकार येण्याआधी जातीवर आधारित राजकारण पाहायला मिळ्याची टीकाही योगींनी केली. “भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे राजकारण केलं जात होतं ते सत्ता केंद्रित आणि जातीवर आधारित राजकारण होतं. त्यावेळी प्रदेश आणि भाषेच्या आधारावर निर्णय घेतले जात होते. मत आणि धर्माच्या आधारावर देशातील व्यवस्था बदलण्याची प्रवृत्ती तयार झाली होती. मात्र सन २०१४ नंतर सरकारी कामांमध्ये सबका साथ सबका विकास हा भाव दिसून आला. लोककल्याण करण्याचा भाव सरकारच्या धोरणांमध्ये दिसून आला,” असं योगी म्हणाले. “५ ऑगस्ट २०२० रोजीही लोककल्याण करण्याचा भाव दिसून आला. ही गोष्टीची एक बाजू झाली तर दुसरी बाजू नकारात्कम असून अशा व्यक्तींना चांगल्या कामामध्येही वाईटच दिसतं,” असा टोलाही योगी यांनी विरोधकांना लगावला.

“गरीबांना घरं मिळत आहेत तर त्यांना वाईट वाटत आहे. स्वत: सत्तेत असताना गरिबांसाठी काहीच केलं नाही मात्र एखादं सरकार त्यांच्यासाठी काम करत आहे तर त्यातही त्यांना वाईट वाटत आहे. ही नकारात्मक विचारसरणी आहे. हीच रावणाची विचारसरणी होती. अशी विचारसरणी केवळ स्वार्थाच्या गोष्टी करते. अशी विचारसरणी मी आणि माझं यामधून कधीच बाहेर येत नाही,” असंही योगी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मात्र आता ही नकारात्मक विचारसरणी बदलली असून देशात एक व्यापक बदल झाला आहे असं सांगत योगींनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केलं.

आणखी वाचा- राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलेला इशारा पाच महिन्यातच ठरला खरा

५ ऑगस्ट २०२० हा दिवस…

उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील गोरक्षनाथ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संम्मेलनामध्ये बोलताना आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये भव्य राममंदिर उभं राहावं अशी आपल्या गुरुंची इच्छा होती असं सांगितलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ आणि गुरु महंत दिग्विजयनाथ यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख करत आता माझ्या गुरुंचे स्वप्न पूर्ण होणार असंही म्हटलं. “अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरु झालं असून ही एका नवीन युगाची सुरुवात आहे असं मतही योगींनी व्यक्त केलं. एखादा समाज आपल्या परंपरा आणि पूर्वजांवर श्रद्धा ठेवत नसेल तर त्या समाजाचे भविष्य चिंताजनक असते असंही योगी यावेळी म्हणाले. ५ ऑगस्ट २०२० हा दिवस आपले पूर्वज, रामभक्त आणि बलिदान देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस होता,” असंही योगी यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:08 pm

Web Title: gorakhpur cm yogi adityanath address the seminar in gorakhnath temple gorakhpur say modi government working as ramrajya scsg 91
Next Stories
1 श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफच्या दहशतवादविरोधी मोहिमेची सूत्रं IPS महिलेच्या हाती
2 भारत चीन सीमेवर तणाव; दोन्ही बाजूचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये
3 सुरेश रैनावर संकटांचा डोंगर, काकांच्या मृत्यूनंतर चुलत भावाचंही निधन
Just Now!
X