उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात प्राणवायूअभावी ७२ बालकांचा मृत्यू झाल्याने योगी आदित्यनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधकांकडून टीका सुरु असतानाच अलाहाबादमधील हायकोर्टानेही राज्य सरकारला जाब विचारला आहे. गोरखपूर रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूचे कारण काय असा प्रश्न हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.

गोरखपूरमध्ये बाबा राघव दास रूग्णालयात गेल्या आठवड्यात प्राणवायूचा पुरेसा पुरवठा नसल्याने ७२ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टात याचिका झाली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने सरकारला प्रश्न विचारला. मृत्यूचे कारण काय असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. याप्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्य सरकारला याप्रकरणावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.  दुसरीकडे गोरखपूर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही जोर धरु लागली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीदेखील गोरखपूर जिल्ह्यातीलस बाबा राघव दास रुग्णालयाला भेट देणार आहेत. शनिवारी ते रुग्णालयाचा दौरा करतील.

दरम्यान, गुरुवारी गोरखपूर जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करुन प्राथमिक अहवाल सादर केला होता. यामध्ये प्राणवायू अभावीच बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. पण यासाठी उत्तर प्रदेश सरकारला जबाबदार ठरवण्यात आलेले नव्हते. आता हायकोर्टात सरकार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.