22 January 2018

News Flash

गोरखपूर दुर्घटना: मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची रुग्णालयाला भेट; दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन

मृतांचा आकडा ७२ वर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 2:52 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी नड्डा यांनी गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मृतांचा आकडा ७० हून अधिक झाल्यानंतर आदित्यनाथ यांनी रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली. रविवारी बाबा राघव दास रुग्णालयातील एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील एकूण मृतांचा आकडा ७२ वर गेला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी बाबा राघव दास रुग्णालयातील चिमुरड्यांना जीव गमवावा लागला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. बालकांच्या मृत्यूंमुळे अत्यंत वेदना झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. ‘बाबा राघव दास रुग्णालयातील घटनेमुळे पंतप्रधान मोदी अतिशय चिंतेत आहेत. या प्रकरणात मोदींकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. बालकांच्या मृत्यूंची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. बाबा राघव दास रुग्णालयातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केंद्रातून मदत पाठवली आहे,’ असे आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.

‘बाबा राघव दास रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जात असून त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला आहे. मी चौथ्यांदा या रुग्णालयात आलो आहे. त्यामुळे कोणीही या समस्येचे गांभीर्य माझ्यापेक्षा अधिक कोणीही समजू शकत नाही,’ असेही आदित्यनाथ यांनी पत्रकारांना सांगितले. याआधी शनिवारी बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला नसल्याचे आदित्यनाथ यांनी म्हटले होते.

मागील सहा दिवसांमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात ७२ बालकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रुग्णालयातील ११ बालकांना प्राण गमवावा लागला. तर शुक्रवारपर्यंत ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी रुग्णालयातील ६० बालकांनी शेवटचा श्वास घेतला. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून शनिवारी  देण्यात आले. या प्रकरणी बोलताना उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी ऑक्सिजनचा पुरवठा १० ऑगस्ट रोजी खंडित झाल्याची माहिती दिली. मात्र काही तासांमध्येच परिस्थिती नियंत्रणात आली, असेही त्यांनी सांगितले. या दरम्यानच्या काळात एकाही बालकाचा मृत्यू झाला नाही, असे सिंग यांनी म्हटले.

First Published on August 13, 2017 2:52 pm

Web Title: gorakhpur hospital tragedy cm yogi adityanath along with jp nadda visits brd medical college hospital
  1. Ramdas Bhamare
    Aug 13, 2017 at 4:03 pm
    'मी चौथ्यांदा या रुग्णालयात आलो आहे. त्यामुळे कोणीही या समस्येचे गांभीर्य माझ्यापेक्षा अधिक कोणीही समजू शकत नाही'.... याचा अर्थ काय रे योग्या ?
    Reply