News Flash

गोरखपूर अर्भकं मृत्यूप्रकरणी डॉ. काफील खान निर्दोष, विभागीय चौकशीत क्लीनचीट

डॉ. खान निर्दोष असल्याचा अहवाल चार महिन्यांपूर्वीच शासनाकडे सोपवण्यात आला होता. मात्र, तो अद्यापर्यंत दाबून ठेवण्यात आला होता, असे विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

गोरखपूर : अर्भकं मृत्यू प्रकरणी डॉ. काफील खान हे चौकशीत निर्दोष ठरले आहेत.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन अभावी झालेल्या अर्भक मृत्यूप्रकरणी आरोपी असलेले निलंबित बालरोगतज्ज्ञ डॉ. काफील खान हे निर्दोष ठरले असून विभागीय चौकशीत त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.

याप्रकरणी विभागीय चौकशीसाठी हिमांशू कुमार यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. अनेक महिने चाललेल्या या चौकशीनंतर सुमारे चार महिन्यांपूर्वीच चौकशीचा संपूर्ण अहवाल शासनाकडे सोपवण्यात आला होता. या अहवालात म्हटले आहे की, डॉ. काफील खान यांच्याकडून या प्रकरणी कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप असंबंध आणि निराधार आहेत.

दोन वर्षांपूर्वी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये १० ते १२ ऑगस्ट २०१७ दरम्यान १०० खाटांच्या वॉर्डमध्ये सुमारे ७० नुकत्याच जन्मलेल्या मुलांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजन अभावी हे मृत्यू झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

प्राथमिक चौकशीत मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. काफील खान, डॉ. सतीश यांच्यासह रुग्णालयाचे ५ कर्मचारी आणि १ ऑक्सिजन सिलेंडरचा वितरक मनिष भंडारी यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी डॉ. काफील खान यांना निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना सुमारे ९ महिन्यांसाठी तुरुंगवासही भोगावा लागला होता. चौकशीदरम्यान, डॉ. काफील खान यांनी कोणताही निष्काळजीपणा केला नसल्याचे निष्पण्ण झाले. यासंदर्भात त्यांनी १८ एप्रिल २०१९ रोजी उत्तर प्रदेश सरकारला अहवाल पाठवला होता. यामध्ये डॉ. खान यांना निर्दोष असल्याचे म्हटले होते. मात्र, या अहवालाला चार महिन्यांपेक्षा अधिक काळ दाबून ठेवण्यात आला होता, असे विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:03 pm

Web Title: gorakhpur infant died case doctor kafil khan got clean chit form departmental inquiry aau 85
Next Stories
1 हनी ट्रॅप : काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी आरएसएसबद्दल केलं ‘हे’ खळबळजनक विधान
2 काँग्रेसने मोदींना दिल्या ‘जागतिक पर्यटन दिना’च्या शुभेच्छा
3 UN मधल्या भाषणाआधीच इम्रान खान यांनी मानली हार
Just Now!
X