उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी शेवटच्या मिनिटाला कट्टर प्रतिस्पर्धी समाजवादी पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा दोन्ही पक्षांना मोठ फायदा झाला असून आपण एकत्र आलो तर भाजपाचा पराभव करणे शक्य आहे असा संदेश या विजयातून गेला आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूर आणि फुलपूर या दोन जागा भाजपाने तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने जिंकल्या होत्या. तिथेच भाजपाला आज दारुण पराभव स्वीकारवा लागला. गोरखपूर हा भाजपाचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. मागच्या तीस वर्षांपासून एकाही लोकसभा निवडणुकीत भाजपाचा इथे पराभव झालेला नाही. स्वत: योगी आदित्यनाथ यांनी सलग २० वर्ष गोरखपूरचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्याआधी योगींचे गुरु गोरखनाथ मंदिराचे मुख्य पूजारी महंत अवैद्यनाथ गोरखपूरमधून खासदार होते. दोघांनी मिळून सलग आठवेळा लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. या मतदारसंघातील गोरखनाथ मंदिर गोरखपूरचे मुख्य सत्ताकेंद्र समजले जाते. गोरखपूरच्या जनतेने आज जो कौल दिला त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपूर्ण राजकारणालाच मोठा झटका दिला आहे

गोरखपूर हा भाजपाचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याआधी योगी गोरखपूरचे खासदार होते. १९९८ सालापासून सलग पाचवेळा योगी गोरखपूरमधून लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत. योगींच्या आधी त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ १९८९ पासून सलग तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

योगींनी या पोटनिवडणुकीला २०१९ लोकसभा निवडणुकीआधीच सराव म्हटले होते. इथून आपण सहज निवडणूक जिंकू असा योगींना विश्वास होता. त्याच विश्वासाला मतदारांनी आज तडा दिला. २०१४ मध्ये सर्वाधिक ८० खासदार असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाने ७३ जागा जिंकल्या होत्या. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीतही भाजपाने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली होती.

योगी आदित्यनाथ यांच्याकडे भाजपाचा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. २०१९ लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची धुरा योगीच्या हाती असेल त्याआधीच हा मोठा झटका आहे.

बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी शेवटच्या मिनिटाला कट्टर प्रतिस्पर्धी समाजवादी पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा दोन्ही पक्षांना मोठ फायदा झाला असून आपण एकत्र आलो तर भाजपाचा पराभव अशक्य नाही असा संदेश या विजयातून गेला आहे.

उत्तर प्रदेशातील दोन जागा गमावल्यामुळे भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ २७२ वर येऊन पोहोचले आहे. केंद्रात बहुमतांसाठी जितक्या जागा लागतात तितक्याच जागा आता भाजपाकडे आहेत. २०१४ मध्ये भाजपाने एकूण २८२ जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी भाजपाला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची सुद्धा गरज नव्हती.