केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार हे बुडते जहाज असल्याची टीका करतानाच आगामी काही दिवसात एनडीएतील अन्य पक्ष देखील भाजपाची साथ सोडतील, असा दावा संयुक्त जनता दलाचे माजी खासदार शरद यादव यांनी केला. गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणूक हे फक्त ट्रेलर होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

शरद यादव यांनी मंगळवारी दुपारी अखिलेश यादव यांची भेट घेतली. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. ‘शरद यादव आणि अखिलेश यांच्या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. हुकूमशाही वृत्तीविरोधात सर्वांनी एकत्र येण्याबाबतही त्यांच्यात चर्चा झाली. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन सक्षम पर्याय देण्याबाबत त्यांच्यात एकमत झाले, अशी माहिती समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली. या भेटीनंतर त्यांनी लखनौत माध्यमांशी संवाद साधला. एनडीएत आता फूट पडू लागली आहे. शिवसेनेनंतर तेलगू देसम पक्षही एनडीएतून बाहेर पडला आहे. आता काही दिवसांमध्ये एनडीएत पक्षच उरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप करताना यादव म्हणाले, २०१९ मध्ये जनताच त्यांना धडा शिकवेल. संविधानाच्या रक्षणासाठी मी देशभरात दौरा करुन विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले. लवकरच मायावती यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.