उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बालमृत्यू प्रकरणी शनिवारी पोलिसांनी डॉ. काफील खान यांना अटक केली. पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून (एसटीएफ) त्यांना सकाळी ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.

बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाकडे लाखो रुपयांचे बील थकल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या ७० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३५ पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांसह इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेसाठी रुग्णालयाचे प्रमुख राजीव मिश्रा हे जबाबदार असल्याचे म्हटले होते. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच मेंदूज्वर विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे. तर त्यांच्या या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

ऑक्सिजनअभावी झालेल्या ७० बालकांच्या मृत्यूंना डॉ. खानही जबाबदार असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवल्यानंतर, त्यांना विभागप्रमुख पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर गायब झालेले हे डॉक्टर आज पोलिसांच्या तावडीत सापडले. ही दुर्घटना झाल्यानंतर सुरूवातीला डॉ. काफील खान यांनी अनेक मुलांचा जीव वाचवला, अशा बातम्या पुढे आल्या होत्या. ११ ऑगस्ट रोजी ज्यावेळी रुग्णालयातील परिस्थिती हाताबाहेर गेली, त्यावेळी डॉ. खान यांनी तातडीने स्वतः खासगी रुग्णालयातील तीन ऑक्सिजन सिलिंडर्स वैद्यकीय महाविद्यलयात पाठवून दिले आणि आपण ते खरेदी केल्याचे सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांचा बनाव उघड झाला होता. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर असताना बाहेरून तीन सिलिंडर मागवण्याची गरजच नव्हती, असे चौकशीतून समोर आले. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून त्यांचा वापर स्वतः खासगी रुग्णालयासाठी केल्याची माहिती पुढे आली होती.