उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत ६३ मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर विरोधक आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काही यूजर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. देश-विदेशातील लहान-मोठ्या घटनांवर ट्विट करणारे पंतप्रधान मोदी या घटनेवर गप्प का, असा सवाल विचारला आहे.

 

गोरखपूर रुग्णालयातील घटनेनंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरून यूजर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. या स्वातंत्र्य भारतात मुलांचा अशा प्रकारे मृत्यू व्हावा ही दुःखद आणि शरमेची बाब आहे, असे काहींनी म्हटले आहे. अनेक लहान-मोठ्या घटनांवर ट्विट करून प्रतिक्रिया देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेनंतरही अजून गप्प का, असा सवाल काहींनी विचारला आहे. मोदी, गोरखपूर येथील घटनेवर किमान एक तरी ट्विट करा. दोषींविरोधात कडक कारवाई व्हायला हवी, असे रवीकिरण नावाच्या यूजर्सने म्हटले आहे.

विदेशातील घटनांवर दुःख व्यक्त करणाऱ्या नरेंद्र मोदींनी गोरखपूर येथील घटनेवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, असे एका यूजरने म्हटले आहे. मोदी यांनी उत्तर प्रदेशातील रुग्णालयाला भेट देऊन पीडितांचे सांत्वन केले पाहिजे. या रुग्णालयात निष्काळजीपणामुळे मुलांना जीव गमवावा लागला आहे, असे ट्विट एका यूजरने केला आहे. मोदीजी, तुम्ही पोर्तुगालमध्ये जंगलात लागलेल्या वणव्यावर बोलता, पण गोरखपूरमध्ये घडलेल्या घटनेवर गप्प का, असा सवाल एका यूजरने विचारला आहे. मोदीजी, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात, असे स्मरण सानिया नावाच्या यूजरने करून दिले आहे.