जगातील सर्वांत उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अनावरणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. परंतु, या भव्य सोहळ्यात पक्षाच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याची कमतरता सर्वांनाच जाणवली. गांधीनगरचे खासदार आणि सध्या पक्षाकडून दुर्लक्षित असलेले नेते लालकृष्ण अडवाणी यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भाजपाचे ‘लोहपुरुष’ समजले जाणारे अडवाणी आणि देशाचे ‘लोहपुरुष’ वल्लभभाई पटेल यांच्यात अनेक बाबतीत साम्य दिसून येते. दोघेही देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. अडवाणी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रशसंक आहेत. तरीही त्यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपाच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. परंतु, यामागे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. अडवाणी यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नाही. याप्रकरणी त्यांचे खासगी सचिव दीपक चोप्रा यांच्याशी संपर्क केला. परंतु, ते उपलब्ध होऊ शकले नसल्याचे वृत्त ‘अहमदाबाद मिरर’ने दिले आहे.

गुजरात काँग्रेसचे अनेक नेतेही स्टॅच्यू ऑफ युनिटी कार्यक्रमाला आले नाहीत. प्रोटोकॉलनुसार त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्राणेश धनानी म्हणाले की, त्यांना निमंत्रण पत्र मिळाले. पण त्यावर त्यांचे नाव लिहिले नव्हते.

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनाही कार्यक्रमाला बोलावण्यात आले नव्हते. मंचावर मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना जागा द्यायला हवी होती. भाजपाचे अध्यक्ष आणि खासदार अमित शाह ज्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नव्हते पण ते मंचावर होते, असे अर्जुन मोधवाडिया यांनी म्हटले.

सरदार पटेल जेव्हा जिवंत होते. तेव्हा काँग्रेसने त्यांची कधी चिंता केली नाही, अशी टीका भाजपा अध्यक्ष जीतू वाघानी यांनी केली. भरुचचे जिल्हाधिकारी रवीकुमार म्हणाले की, पर्यटन विभागाकडे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे काम होते. परंतु, अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांना निमंत्रण पत्र पाठवले होते की नाही याचा शोध घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.