तालिबान्यांनी गोळ्या डागल्यानंतरही तुम्ही मला आज जिवंत पाहू शकता; कारण जगभरातील लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे मला देवाकडून दुसरे आयुष्य लाभले आहे. हे दुसरे आयुष्य लोकांच्या सेवेसाठी वेचणार असल्याची भावना तालिबानविरोधात धैर्याने लढलेल्या मलाला युसूफझाई हिने व्यक्त केली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये तालिबान्यांनी हल्ला केल्यानंतर ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या मलालाने पहिल्यांदाच जाहीररीत्या कृतज्ञता व्यक्त केली.
दिवसेंदिवस माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. माझ्यावर कोणती मोठी शस्त्रक्रिया झाली असल्याचे जाणवतही नाही. मी बोलू शकते, हे जग पाहू शकते, यामध्ये जगाने केलेल्या प्रार्थनेचे मोल सर्वात मोठे आहे, असे मलाला म्हणाली. बर्मिगहम येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयामध्ये मलालाच्या कवटीवर नुकतीच पाच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिने व्हिडीओद्वारे उर्दू आणि पश्तू भाषेतून जाहीर निवेदन केले. यात जगभरातील लोकांनी आपल्या जिवासाठी केलेल्या प्रार्थनेबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. मला लाभलेले दुसरे आयुष्य मी लोकसेवेस अर्पण करणार आहे. जगामधील प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे तिने स्पष्ट केले. यावेळी अमेरिकी सेवाभावी संस्थेच्या मदतीने ‘मलाला फंड’ची तिने घोषणा केली. या द्वारे पाकिस्तान व इतर गरीब देशांमधील मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारला जाणार आहे. मलाला फंडच्या समितीवर जगभरातील शैक्षणिक तज्ज्ञ आणि मलालाच्या कुटुंबीयांचा समावेश असणार आहे. मलालावर हल्ला होण्यापूर्वीच पाकिस्तानमधील मुलींना शिक्षण देणारी संस्था उभारण्यामध्ये मलाला तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत सक्रिय होती. मुलींच्या शिक्षणाबाबत आग्रही असल्याबद्दल, तसेच पाश्चिमात्य विचारसरणी असल्याबद्दल तिच्यावर हल्ला केल्याचे स्पष्टीकरण तालिबानने दिले होते. तालिबानविरोधात बोलण्याच्या तिच्या धाडसामुळे आणि तिच्या लढय़ामुळे अल्पकाळामध्येच मलाला जगभरासाठी धैर्याचे प्रतीक बनली आहे.  नोबेल पारितोषिकासाठीही तिचा विचार होत आहे.
काय करणार मलाला?
पाकिस्तानमधील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचे काम ‘मलाला फंड’द्वारे सुरुवातीला आखले जाणार आहे. याद्वारे स्त्रीशिक्षणासाठी सकारात्मक विचारसरणी, तसेच गरीब कुटुंबांसाठी मदत कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या आराखडय़ानुसार २०१३ अखेरपासून मलालाची संस्था सक्रिय होणार आहे.