चीनशी संबंध पुनर्स्थापित करण्याचे सूतोवाच; प्रेमदास पराभूत 

श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीत युद्धकाळातील वादग्रस्त संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांची निवड झाली असून त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार साजिथ प्रेमदास यांचा पराभव केला. रविवारी अटीतटीच्या झालेल्या या लढतीचा निकाल जाहीर करण्यात आला.

राजपक्षे घराणे हे चीनकडे झुकलेले असून सात महिन्यांपूर्वी ईस्टर संडेच्या दहशतवादी हल्ल्यात २६९ लोक मारले गेल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षा आव्हानांमुळे या प्रश्नावर कठोर भूमिका घेतलेल्या गोटाबाया राजपक्षे यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे. राजपक्षे (वय ७०) हे मैत्रीपाल सिरीसेना यांचे उत्तराधिकारी असतील.

‘श्रीलंकेच्या दृष्टिकोनातून एका नव्या प्रवासाची ही सुरूवात आहे, सगळे देशवासीय यातील सहप्रवासी असतील, आताचा हा विजय शांत व नम्रपणे साजरा करू या,’ असे अध्यक्षपदी निवडून आलेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल राजपक्षे यांनी म्हटले आहे. श्रीलंकेला कर्जपुरवठा करणाऱ्या चीनबरोबरचे संबंध पुनस्र्थापित करण्याचे सूतोवाच त्यांनी केले असून श्रीलंका चीनच्या कर्जसापळ्यात गुंतत चालल्याची टीका होत असतानाही त्यांनी प्रचारातही चीनशी मैत्रीचे गोडवे गायले होते. प्रेमदास (वय ५२) हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते, ते भारत व अमेरिका यांना अनुकूल मानले जात होते. पण त्यांनी निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच पराभव मान्य केला. सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीच्या उपनेतेपदाचा त्यांनी लगेच राजीनामा दिला आहे. प्रेमदास यांनी सांगितले ,की ‘ज्या नागरिकांनी मला मते दिली त्यांचा मी आभारी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात त्यापुढे मी नतमस्तक आहे. तुमचा पाठिंबा हाच माझ्या राजकीय कारकिर्दीतील प्रेरणेचा स्रोत आहे. आजच्या निकालानंतर पक्षाच्या उपनेतेपदाचा मी राजीनामा देत आहे.’ राजपक्षे यांनी अध्यक्षीय निवडणुकीत प्रेमदास यांच्यावर सकाळपासूनच आघाडी कायम राखली होती.

सिंहली पट्टय़ात पाठिंबा

निवृत्त लेफ्टनंट कर्नल राजपक्षे यांना सिंहली लोकांचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्य़ात जास्त मते मिळाली तर प्रेमदास यांनी तामिळ  बहुल पट्टय़ात बाजी मारली. राजपक्षे हे १० वर्षे संरक्षण मंत्रालयात सचिव होते. त्यांना पाच वर्षांसाठी अध्यक्ष घोषित करण्यात आले आहे.

या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाले होते. दरम्यान, पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे यांनी राजीनामा देण्याचे ठरवले असून त्यांनी शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतली. चालू संसद पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत तरी विसर्जित करता येणार नाही. विक्रमसिंगे यांना ते स्वत:हून पायउतार झाल्याशिवाय काढता येणार नाही. राजपक्ष यांनी त्यांचे बंधू महिंदा राजपक्ष यांना पंतप्रधान नेमण्याचे ठरवले आहे. प्रेमदास हे हत्या करण्यात आलेले अध्यक्ष रणसिंगे प्रेमदास यांचे पुत्र असून त्यांना २५ वर्षे राजकारणाचा अनुभव आहे. तामिळी लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. सामान्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा होती पण ती कामी आली नाही.

तेरा लाख मतांनी विजयी

अध्यक्षीय निवडणुकीत राजपक्षे यांनी प्रेमदास यांच्यावर तेरा लाख मतांनी मात केली असून राजपक्षे यांना ६९२४२५५ म्हणजे ५५.२५ टक्के मते पडली. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रेमदास यांना ५५६४२३९ म्हणजे ४१.९९ टक्के मते पडली. इतर उमेदवारांना ५.७६ टक्के मते मिळाली आहेत.

चीनचे वर्चस्व वाढणार : श्रीलंकेवर आता पुन्हा चीनचे वर्चस्व वाढणार आहे कारण गोटाबाया राजपक्षे हे चीनसमर्थक आहेत. हिंदी महासागरात पाय पसरण्याच्या चीनच्या कारस्थानांना पुन्हा पाठबळ मिळणार आहे. चीनने श्रीलंकेचे हंबणटोटा बंदर २०१७ मध्ये कर्जाच्या बदल्यात ताब्यात घेतले होते. दिजबोती येथे हिंदी महासागरात चीनचा नाविक तळ आहे. चीनने श्रीलंकेला जुलैत एक युद्धनौका भेट दिली होती. ईस्टर संडे हल्ल्यात २६९ लोक मारले गेल्याने लोकांमध्ये असुरक्षितततेची भावना होती, त्यामुळे एलटीटीईचा बिमोड करण्यात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या राजपक्षे यांची अध्यक्षपदी निवड होण्यात मदत झाली असे मानले जाते.