उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे राजधानीतील योग दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल भाजपचे नेते राम माधव यांनी त्यांच्यावर केलेल्या ट्विप्पणी वरून केंद्र सरकारने सोमवारी माफी मागितली. माधव यांनी या मुद्दय़ावर ‘फुटीचे’ राजकारण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राम माधव यांनीही ही चूक असल्याचे मान्य केले असून  माफी मागितली आहे आणि विधान मागे घेतले आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. नाईक यांचे वक्तव्यानंतर हे प्रकरण संपले आहे, असे उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानेही स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या शाळांमध्ये योग अनिवार्य
केंद्राकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना योग हा विषय अनिवार्य करण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाणार आहे असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्लीत योगविषयक कार्यक्रमात सांगितले.

* उत्कृष्ट योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांस पाच लाखांचे बक्षीस.
* सक्तीचा योगाभ्यास केंद्रीय विद्यालये व जवाहर नवोदय विद्यालयांना लागू
* डिप्लोमा इन योग एज्युकेशन, बॅचलर इन योग एज्युकेशन व मास्टर्स इन योग एज्युकेशन  
* राज्य सरकारे केंद्राचा योग अभ्यासक्रम वापरू शकतात पण सक्ती नाही.

योगावर हक्क सांगण्यासाठी आता काँग्रेसही सरसावली
भारतासह जगभरातील लक्षावधी नागरिकांनी सहभागी होऊन यशस्वी केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’च्या कार्यक्रमापासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी अंतर राखले. योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, आध्यात्मिक गुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असताना काँग्रेस नेत्यांनी मात्र ‘धर्मनिरपेक्ष’ प्रतिमा वाचविण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे टाळले. भारतात विकसित झालेल्या योगविज्ञानशास्त्राचा सराव करताना पंतप्रधान मोदी व भाजप नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. त्यात आपण मागे राहू नये म्हणून काँग्रेसकडून योजनापूर्वक देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू  यांचे योगासन मुद्रेतील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले.  काँग्रेस समर्थकांनी या छायाचित्राचा आधार घेत पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.  नेहरूंसह माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, याोगगुरू धीरेंद्र ब्रह्मचारी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले.

अन्सारी यांना राजशिष्टाचाराचा विचार करून निमंत्रण देण्यात आले नव्हते. कारण त्यांचे पद पंतप्रधानांपेक्षा उच्च आहे. माधव यांच्याकडून चूक झाली असेल; परंतु अशा चुका टाळायला हव्यात.
-श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री