टू जी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी संसदेत खुलासा करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यामुळे हे प्रकरण बाहेर आले होते. त्यांच्या जनहित याचिकेवरूनच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयावर आपण नाराज नसून सरकारने याप्रकरणी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

इतकंच नव्हे तर स्वामी यांनी जयललिता यांचे खटल्याचे उदाहरण देत आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, या निर्णयाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात अपील केले पाहिजे. जयललिता यांच्या खटल्यातही उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने फिरवले होते. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळीही उच्च न्यायालयाच्या निकालानंतर जल्लोष केला होता.

मी अजून पूर्ण निकाल वाचलेला नाही. मला मीडियाच्या माध्यमातूनच याची माहिती झाली आहे. निकालाची प्रत मिळण्याची मी वाट पाहत आहे. त्यानंतरच मला पुढील रणनिती आखता येईल, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे स्वामी यांनी टू जी प्रकरणापूर्वी अनेक प्रकरणात जनहित याचिका दाखल केलेली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणीही त्यांनीच याचिका दाखल केली होती.

निकालानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. काँग्रेसने भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅगचे तत्कालीन विनोद राय यांच्यावर टीका केली आहे. भाजपकडून अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.