आसामकडे दुर्लक्ष झाल्याची ऐतिहासिक चूक आपले सरकार सुधारत असून राज्याच्या विकासाला आपल्या सरकारचे प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले.

केंद्रातील आणि आसाममधील भाजपच्या दुहेरी इंजिन असलेल्या सरकारांनी राज्य आणि उर्वरित देश यांच्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक अंतर कमी केले आहे, स्वातंत्र्यापूर्वी आसाममध्ये उच्च दरडोई उत्पन्न होते, मात्र १९४७ नंतर आसामच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आसामकडे दुर्लक्ष झाल्याची ऐतिहासिक चूक सुधारण्यास सुरुवात केली आणि आता भाजपच्या सरकारचे राज्याच्या विकासाला प्राधान्य आहे, असे मोदी म्हणाले. मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ३२३१ कोटी रुपयांच्या महाबाहू ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

ब्रह्मपुत्रा नदीचे आशीर्वाद

ब्रह्मपुत्रा ही केवळ नदीच नाही तर ईशान्येकडील वांशिक वैविध्यतेच्या कथेचे प्रकटीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांत कित्येक गोष्टी बदलल्या परंतु ब्रह्मपुत्रा नदीचे अगणित आशीर्वाद बदलले नाहीत, असे मोदी म्हणाले.