चालू वर्षातच सरकार 5G स्पेक्ट्रम्सचा लिलाव करणार आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारी त्यांनी दूरसंचार मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, सरकारी दूरसंचार कंपन्या एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्यांची परिस्थिती सुधारण्याला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दूरसंचार कंपन्यांना एकमेकांच्या सहकार्याने आणि व्यावसायिक दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. चालू वर्षामध्ये आम्ही 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहोत, असेही प्रसाद यांनी सांगितले. तसेच 100 दिवसांमध्ये 5G सेवेचे परीक्षण, पाच लाख वाय-फाय हॉटस्पॉटवर काम करणे आणि दूरसंचार क्षेत्रातील उत्पादनांना प्रोस्ताहन देण्यालाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पदभार स्वीकारल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि दूरसंचार क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या प्रमुखांशी चर्चा केली. दरम्यान, संजय धोत्रे यांनीदेखील आपला दूरसंचार राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. सध्या देशातील दूरसंचार विभागासमोर अनेक मोठ्या अडचणी आहेत. या अडचणीतून दूरसंचार विभागाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर असेल. दूरसंचार क्षेत्राला पुन्हा एकदा नफ्यात आणण्याला प्राधान्य देण्यावर सध्या काम करण्यात येणार आहे. रविशंकर प्रसाद हे चार वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. तसेच त्यांनी सरकारच्या योजनांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यामध्ये प्रामुख्याने डिजिटल इंडियासारख्या योजनेचा समावेश होता.