भारतात लवकरच प्लास्टिक नोटा येणार आहेत. प्लास्टिक नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक कच्चा माल खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आज केंद्र सरकारने संसदेत दिली. आरबीआयकडून कागदांच्या नोटांऐवजी प्लास्टिक नोटा छापण्याचा कोणता प्रस्ताव आहे का, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्यावर अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. प्लास्टिक नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कच्चा माल खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

बऱ्याच कालावधीनंतर प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये चाचणी स्वरुपात भौगोलिक रचनेनुसार निवडक पाच शहरांत १०-१० रुपयांच्या १ अब्ज प्लास्टिक नोटा चलनात आणण्यात येतील, अशी माहिती संसदेत दिली होती. त्यासाठी कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या पाच शहरांची निवड केली होती. प्लास्टिक नोटा सरासरी पाच वर्षांपर्यंत सुरक्षित राहतात आणि त्यांची बोगस छपाई करणे कठिण आहे. याशिवाय कागदाच्या नोटांच्या तुलनेत अधिक चांगल्या दिसतात. सर्वात आधी ऑस्ट्रियाने बोगस नोटांचा उद्योग रोखण्यासाठी प्लास्टिक नोटा चलनात आणल्या होत्या.

यासंबंधी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना मेघवाल यांनी सांगितले की, ‘आरबीआयने २०१५ मध्ये सांगितले होते की, त्यांना १००० रुपयांच्या काही नोटा मिळाल्या. त्यात सेक्युरिटी थ्रेड नव्हते. त्या नोटा नाशिकमधील प्रेसमध्ये (सीएनपी) छापण्यात आल्या होत्या. त्यासाठीचा पेपर सेक्युरिटी पेपर मिलमधून (एसपीएम) आला होता. सेक्युरिटी प्रिंटींग अॅण्ड मिटिंग कॉर्पोरेशनसह (एसपीएमसीआयएल) एसपीएम आणि सीएनपी यांच्याकडून त्याची चौकशी सुरू आहे.’ यातील संबंधित दोषी लोकांना मोठा दंड भरावा लागणार आहे. तसेच विभागीय नियमांनुसार, कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मेघवाल यांनी यावेळी सांगितले. नोटांच्या निर्मिती प्रक्रियेत गुणवत्ता प्रक्रिया आणि ऑनलाइन निरीक्षण या बाबी अधिक मजबूत बनवण्यासाठी उचित पावले उचलण्यात आली आहेत. तसेच भविष्यात अशा चूका टाळण्यासाठी संबंधित लोकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही मेघवाल यांनी सांगितले.