गांधी जयंती, दसरा आणि शनिवार-रविवार अशी सुट्टी जोडून आल्यामुळे पर्यटनाचे कार्यक्रम आखणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे आहेत. २ ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे, असे फर्मान केंद्र सरकारने काढले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची शपथ गांधी जयंतीचे औचित्य साधत केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
केंद्रीय कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी याबाबतचे सूचनापत्र केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व सचिवालयांना पाठविले आहे. गांधी जयंतीदिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते. मात्र यंदा सरकारी कार्यालयांमध्ये, सार्वजनिक समारंभात, तसेच गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी ‘स्वच्छतेची शपथ’ घ्यावी, असे या सूचनापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे राष्ट्रीय कार्य असून प्रत्येक मंत्रालयाने उत्साहाने त्यात सहभागी व्हावे आणि स्वच्छतेची तसेच जनजागृतीच्या अभियानात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सेठ यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंतीचे औचित्य साधून भारतात स्वच्छतेची मोहीम सुरू करणार आहेत, त्याच दृष्टीने कचरामुक्ती, शासकीय कार्यालयांमधील अनावश्यक वस्तूंची निरवानिरव आदींचा समावेश असलेला आठवडाभराचा कार्यक्रम सरकारी कार्यालयांमध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला.
स्वच्छ घरे, स्वच्छ कार्यालये, शाळा-रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, पुतळे, राष्ट्रीय स्मारके, नद्या, तलाव आणि अन्य सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेबाबात जागृती आणि त्यासाठी लोकांचा सहभाग या मोहिमेत अपेक्षित आहे. ‘गरिबांना समाजात सन्मानाचे स्थान नसते आणि सन्मानाचे स्थान मिळविण्यास स्वच्छतेपासून प्रारंभ होतो. म्हणूनच स्वच्छ भारत अभियानाची गरज आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात काढले होते. त्या पाश्र्वभूमीवर हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.