आगामी लोकसभा निवडणुकांच्या  पाश्र्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेला इंदिरा गांधी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. या व्यवस्थेचे नामकरण ‘इंदिराम्मा अन्न योजना’ असे करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करणे आणि विरोधकांना त्याचे श्रेय घेण्यापासून दूर ठेवणे असा त्यामागे दुहेरी उद्देश आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावित नावावर शिक्कमोर्तब होणार आहे. ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे नामकरण ‘इंदिराम्मा अन्न योजना’ असे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी दिली.
याद्वारे केवळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे नामकरण करण्यात येणार आहे, मात्र त्याबाबतच्या कायद्यात बदल करण्यात येणार नाही, असेही थॉमस यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे नामकरण करण्याबरोबरच ही योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी बोधचिन्हाचा वापर करण्याचेही सरकारच्या विताराधीन आहे, असेही ते म्हणाले. सदर योजनेसाठी उत्कृष्ट बोधचिन्हाची निवड करता यावी म्हणून बोधचिन्ह रचना स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.