गुजराती समाजाचे पारंपरिक खाद्यपदार्थ असलेले ढोकळा आणि खाकरा लवकरचं केंद्र सरकारअंतर्गत येणा-या विभागीय उपहारगृहांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. केंद्राच्या कार्यालयांमध्ये असलेल्या उपहारगृहांमध्ये सध्या उत्तरेकडील आणि दाक्षिणात्य पदार्थ मिळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पचनास हलके आणि पोषक पदार्थ उपहारगृहांमध्ये ठेवण्याचा आदेश काढला आहे. तसेच त्यांनी काही पदार्थांची नावे असलेली यादी दिली असून, त्यात ढोकळा आणि खाकरा या गुजराती पदार्थांचा समावेश आहे. केंद्र सरकारी संस्था आणि कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना अधिक चांगले अन्नपदार्थ मिळावेत, असा या मागील हेतू असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालयांना पाठविलेल्या पदार्थांच्या यादीत भाज्यांचे सूप, ढोकळा, खाकरा, पोहे, मटार चाट, पावभाजी, उपमा, पॅटीस, साधे-गोड दही, सोया स्नॅक, लिंबूपाणी, लस्सी आणि छास, आइस्क्रीम आणि श्रीखंड आदी पदार्थांचा समावेश असून, हे पदार्थ उपहारगृहातील मेनूमध्ये समाविष्ट करण्याचे सुचविले आहे. तसेच, स्थानिक गरजा आणि ग्राहकांच्या अभिरुचीनुसार उपहारगृहात कोणते पदार्थ ठेवावेत याची निवड उपहारगृहाच्या व्यवस्थापकीय समितीने करावी असेही त्यात म्हटले आहे. त्याचसोबत मंत्रालय आणि विभागीय उपहारगृहांमध्ये अंतर्गत स्वच्छता आणि निरोगी अन्न ठेवण्याची विनंती यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये एकूण ७२३ उपहारगृहे आहेत.