केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या अनेक सहकाऱ्यांची नावं आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षीय यूएपीए कायद्यात बदल केला होता. ज्यानुसार आता भारतात कोणत्याही व्यक्तीस दहशतवादी म्हणून घोषित केले जाऊ शकते. या अगोदर केवळ संघटनेलाच दहशतवदी संघटना म्हणून घोषित करता येत होतं.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंगळवारी यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी व दहशतवादाबद्दलच्या शून्य सहिष्णुता धोरणाबाबत कटिबद्धता दर्शवत , सरकारने यूपीए अधिनियम १९६७ च्या तरतुदींनुसार आणखी १८ जणांना दहशवतवादी म्हणून घोषित केलं आहे.

या १८ दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. सरकारने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर ए तोयबाचा युसूफ मुजम्मील, लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की, १९९९ मधील कंधार आयसी-८१४ विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकल बंधूंना देखील दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

हे आहेत १८ दहशतवादी –
१. साजिद मीर (लष्कर ए तोयबा), २. युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), ३.अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), ४. शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) ५. फरहातुल्लाह गोरी ६.अब्दुल रऊफ असगर ७. इब्राहीम अतहर ८. युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ १०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) ११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) १२. जफर हुसैन भट्ट १३. रियाज इस्माइल १४. मोहम्मद इकबाल १५. छोटा शकील १६. मोहम्मद अनीस १७. टाइगर मेमन १८. जावेद चिकना