५०० व १००० रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. रविवारी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी बंदी घालण्याचे समर्थन करताना नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने आपल्या निर्णयात थोडासा बदल केला आहे. सरकारने पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील चार दिवसांत बँकांकडे ५०० व १००० रूपयांच्या नोटांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख कोटी जमा झाले असून बँकांनी सुमारे ५० हजार कोटी रूपयांचे वितरण केले असल्याची माहिती जेटली यांनी दिली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक, इतर बँका आणि पोस्ट कार्यालयांमध्ये समन्वय ठेवला जात असल्याचेही ते म्हणाले.

काही ठळक निर्णय:
* आठवड्याला २० हजार रूपये काढण्याची मर्यादा होती. त्यात ४ हजारांची वाढ करून ती २४ हजारपर्यंत नेण्यात आली आहे. दिवसाला १० हजार रूपये काढण्याची मर्यादा हटवण्यात आली आहे.

* एटीएममधून दिवसाला २ हजार रूपये काढण्याची मर्यादा होती. ती २५०० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

* सध्या बँकेतून ४ हजार रूपये देण्याची मर्यादा आहे. ती ४५०० हजार रूपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
* सर्व बँकांना मोबाइल बँकिंग व्हॅन सुरू करण्याच्या सूचना. या मोबाइल व्हॅन महत्वाची रूग्णालयात जाणार. यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळणार.
* रोख व्यवहारासाठी वेगळा कक्ष उभा करण्याच्या बँकांना सूचना
* ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी वेगळ्या रांगा सुरू करण्याची सूचना

* काही रूग्णालये, केटरर्स चेक, डीडी, ऑनलाईन पेमेंटची सुविधा ग्राहकांना देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंबंधी ग्राहकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या संस्थेबाबत तक्रार करण्याच्या सूचना.