तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेल्या काँग्रेससाठी राजस्थान नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. राजस्थानमधील सत्तेला राजकीय हादरे जाणवू लागल्याचं दिसत आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय पॅटर्नची राजस्थानातही पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदारही भाजपात दाखल झाल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात येऊन कोसळलं. त्यानंतर भाजपानं मध्य प्रदेशातील सत्तेची सूत्र हाती घेतली. या घटनेला तीन महिने लोटत नाही, तोच राजस्थानातही अस्थिरतेचे हादरे जाणवू लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर काल (११ जुलै) राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेले. या आमदारांना हरयाणातील गुरुग्रामध्ये एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. शनिवारी रात्री आमदार ‘आयटीसी हॉटेल ग्रॅण्ड’मध्ये दाखल झाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या हॉटेल बाहेरील हालचाली वाढल्याचं वृत्त आहे. त्याचबरोबर हे आमदार हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती आधीपासूनच मिळाली होती. त्यामुळे यंत्रणा आधीच सर्तक झाली होती.

मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अविश्वास असल्याचं बोललं जात असून, त्यामुळे सचिन पायलट हे नाराज असल्याचं समजतं.