इराकमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांना आयसीसनं ठार केलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. इराकमधील मोसूल शहरातून २०१४ मध्ये या भारतीयांचं अपहरण करण्यात आलं होतं. हे ३९ बेपत्ता जिवंत असल्याचा समज अगदी गेल्यावर्षीपर्यंत भारत आणि इराकचा होता. परंतु त्यांना फार पूर्वीच ठार करण्यात आलं होतं, मी याची माहिती सरकारला दिली पण त्यांनी ३९ जणांच्या कुटुंबियांची दिशाभूल केली असा दावा मोसूलमधून पळालेल्या हरजीत मसीहनं केला आहे.

जून २०१४ मध्ये इराकमधील मोसूलमधून आयसिस या दहशतवादी संघटनेने ४० भारतीयांचं अपहरण केलं होतं. या ४० जणांपैकी एकटा हरजीत मसीह सुखरुप परतला होता. मात्र या ३९ भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. ऑक्टोबर २०१७ पर्यंत हे भारतीय जिवंत असल्याचा किंवा इराकमधील एखाद्या कारागृहात बंद असल्याचा समज होता. परंतु या सर्वांना आयसीसनं ठार केली असल्याची माहिती स्वराज यांनी मंगळवारी दिली. ‘अपहरण केलेल्या या भारतीयांना फार पूर्वीच आयसीसनं ठार केलं होतं. मी सरकारला सत्य आधीच सांगितलं होतं. पण तरीही सरकारनं या ३९ कुटुंबांची दिशाभूल केली असल्याचा दावा हरजीत मसीहनं केला आहे.

दरम्यान हरजीतनं याआधी आपल्या पायाला गोळी लागल्याचा दावाही केला होता. हरजीत खोटं नाव धारण करून काही बांगलादेशी नागरिकांसमवेत मोसूलमधून पळून जाण्यास यशस्वी झाला होता. पण आपण तिथून कसा पळ काढला हे मात्र सांगायला तो तयार नसल्याचं सुषमा स्वराज राज्य सभेत म्हणाल्या. आयसीसकडून ठार करण्यात आलेल्या ३९ पैकी ३१ जण हिमाचल आणि पंजाबचे आहेत. तर उर्वरित लोक बिहार आणि बंगालचे आहेत. यातील ३८ लोकांचे डीएनए १०० टक्के जुळले आणि एका व्यक्तीचा डीएनए ७० टक्के जुळला आहे. जनरल व्ही. के. सिंह त्यांचे पार्थिव घेऊन भारतात येतील अशी माहितीही स्वराज यांनी राज्यसभेत दिली.