केंद्र सरकारचा सर्व राज्यांना फतवा

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर केंद्राने सर्व राज्यांना देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लोकांमध्ये उत्साहाची भावना निर्माण करावी यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत पत्र लिहिले आहे.

तथापि, पश्चिम बंगालने आपल्या शाळांना केंद्राने पाठवलेल्या या परिपत्रकाचे पालन न करण्यास सांगितले आहे. तृणमूल काँग्रेस सरकारची ही कृती अतिशय दुर्दैवी असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

केंद्राने राज्यांना दिलेल्या या सूचना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शपथ घेणे, देशाला  स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्यांचे स्मरण करणे यासाठी आहेत. या सूचना पाळण्याचे शाळांवर बंधन नाही. हा धर्मनिरपेक्षता अजेंडय़ाचा भाग असल्याचे जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

देशासाठी महत्त्वपूर्ण असणारा हा दिवस देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात यावा. नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या अभियानासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला सहभागी करण्यासाठी एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नवा भारत गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवादमुक्त, जातीमुक्त आणि सांप्रदायिकतामुक्त करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष गर्ग यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

गर्ग यांनी पत्रामध्ये राज्यांना ९ ते ३० ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा प्रचार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या अभियानासाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हा राजकीय पक्षाचा अजेंडा नव्हे : जावडेकर

या वेळी जावडेकर यांनी पश्चिम बंगाल सर्व शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक यांच्या द्वारा स्वातंत्र्य दिवस केंद्राच्या परिपत्रकाप्रमाणे साजरा न करण्याबाबतचे निवेदन सादर केले. पश्चिम बंगाल सरकारने निवेदनामध्ये वापरलेली भाषा विचित्र आणि दुर्दैवी आहे. आम्ही त्यांच्याशी याबाबत चर्चा करू. आम्ही धर्मनिरपेक्ष अजेंडा सादर केला आहे. हा काही कोणत्या राजकीय पक्षाचा अजेंडा नसल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.