करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान या कालावधीत विमानांच्या उड्डाणांवरही बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात ज्या प्रवशांनी विमानांच तिकिट आरक्षित केलं होतं त्यांना संपूर्ण रक्कम रिफंड करण्याऐवजी कंपन्यांनी नवी तारीख निवडण्यास सांगितलं होतं. परंतु आज (गुरूवार) सरकारनं एक पत्रक काढून या कालावधीत तिकिट आरक्षित करण्यात आलेल्या प्रवाशांचे पैसे परत करण्याचे आदेश विमान कंपन्यांना दिले आहेत. परंतु ज्या प्रवाशांनी २४ मार्च किंवा त्या पूर्वी म्हणजेच लॉकडाउन पूर्वी तिकिटं आरक्षित केली आहेत त्यांना रिफंड मिळणार नसून ज्यांनी २५ मार्च नंतर ज्यांनी तिकिटं आरक्षित केली त्यांनाच रिफंड देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या प्रवाशांनी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीदरम्यान विमानाची तिकिटं आरक्षित केली असतील आणि ज्यांची प्रवासाची तारीख दुसऱ्या लॉकडाउनचा कालावधी म्हणजे १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान असेल त्यांनाच तिकिटांचे पैसे परत मिळणार आहेत. तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिकिटं आरक्षित केलेल्या प्रवाशांना संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयानं परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.


लॉकडाउनच्या कालावधीत उड्डाणं रद्द झाल्यानंतर तिकिटं रद्द करणाऱ्या प्रवाशांना विमान कंपन्यांकडून पूर्ण पैस परत करण्यात येत नव्हते. तसंच वर्षभरात कधीही त्यांना प्रवास करण्याची मुभा कंपन्यांनी दिली होती. तर दुसरीकडे त्यावेळी असणाऱ्या किंमतीतला फरकही प्रवाशांना द्यावा लागेल, असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं होतं. तिकिट रद्द करणाऱ्यांची कोणतीही चूक नसताना कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात तिकिट रद्द करण्याचं शुल्क आकारण्यात येत होतं.