पेट्रोल पंप आणि वाहनांच्या रांगा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे समीकरण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण आता पेट्रोलियम पदार्थ घरपोच देण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरु आहे. ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केल्यास पेट्रोलियम पदार्थ घरपोच करण्यात येईल, असे पेट्रोल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. यामुळे पेट्रोल पंपांवरील लांब रांगा टाळता येतील, असे प्रधान यांनी म्हटले आहे.

देशभरातील ३५ कोटी लोक दर दिवशी पेट्रोल पंपावर येतात. देशभरातील पेट्रोल पंपांवर वर्षभरात तब्बल अडीच हजार कोटींची उलाढाल होते. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इंधन वापरकर्ता देश आहे. त्यामुळे देशभरातील पेट्रोल पंपांवर दररोज रांगा लागतात. १ मेपासून देशातील पाच शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत. यानंतर संपूर्ण देशातील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल केले जातील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींनुसार भारतीय पेट्रोल पंपांवरील दररोज बदलतील. सध्या देशातील पेट्रोल, डिझेलचे दर १५ दिवसांनंतर बदलतात.