देशातील १०१ नद्यांचे जलवाहतुकीच्या मार्गात रूपांतर करण्याचा प्रस्ताव चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजुरीसाठी संसदेसमोर ठेवण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
सध्या हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला आहे, देशातील १०१ नद्या जलवाहतुकीच्या मार्गात रूपांतर करण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच संसदेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्र्यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
यापैकी ५५ नद्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रकल्प खासगी आणि सार्वजनिक सहभागातून उभारण्यात येणार असून निधीची कमतरता पडणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
त्याचबरोबर देशातील कोणत्याही बंदराचे खासगीकरण करण्यात येणार नाही आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही. आतापर्यंत सरकारने केवळ पाच नद्या जलवाहतुकीसाठी घोषित केल्या आहेत. जलमार्गामुळे आर्थिक वाढ होण्यास मोलाची मदत होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.