केंद्र सरकारने सुमारे १९ वस्तूंवरील आयात शुल्कात बुधवारी वाढ केली. ही नवी शुल्कवाढ आजच (दि.२६) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे, अर्थमंत्रालयाने एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली. यामुळे विविध घरगुती दैनंदिन वापराऱ्या वस्तू महागणार आहेत.

अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, जेट इंधन, वातानुकुलीत यंत्रणा (एसी), शीतपेट्या (रेफ्रिजरेटर्स), वॉशिंग मशिन, स्पीकर्स, कारचे टायर्स, ज्वेलरी, किचनमधील वस्तू आणि टेबलवेअर काही प्लॅस्टिकच्या वस्तू, सुटकेस आदी वस्तूंचा यात समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात या वस्तूंचे आयात शुल्क ८६,००० हजार कोटी इतके होते.

तूट भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारकडून आयात केल्या जाणाऱ्या १९ वस्तूंवरील जकात शुल्क वाढवण्यात आले आहे. हे आयात शुल्क दुप्पट करण्यात आले आहे. एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशिनवरील (१० किलोपेक्षा कमी) आयात शुल्क २० टक्के इतके करण्यात आले आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. ही आयात शुल्कवाढ २६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.