भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कामगार संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर या मुद्दय़ावरून माघार घेत केंद्राने व्याजदरात ०.१ टक्क्य़ाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. आता २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी देशभरातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतील ठेवीवर ८.८ टक्के व्याज मिळणार आहे.
पीएफच्या ठेवींवर ८.७ टक्के व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नुकताच जाहीर केला. त्यावर देशभरातील कामगार संघटनांमध्ये तीव्र नाराजी उमटली. राष्ट्रीय स्वयंसवेक संघप्रणीत भारतीय मजदूर संघानेही केंद्राच्या या निर्णयाविरोधात येत्या बुधवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. कामगार संघटनांचा रोष आणि कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेत केंद्र सरकारने निर्णयावरून घुमजाव करत पीएफवरील व्याजदरात ०.१ टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही माहिती दिली. कामगारांच्या रोषामुळे निर्णयात बदल करण्याची ही केंद्राची दोन महिन्यांतील तिसरी वेळ आहे. अर्थसंकल्पादरम्यान पीएफची रक्कम काढण्यावर प्राप्तिकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कामगार संघटनांनी विरोध केल्यावर हा निर्णय रद्द करण्यात आला. तर वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्याशिवाय पीएफमधील ठेवी काढता येणार नाहीत, या निर्णयावरूनही केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे.