लखनौ : भारताने पाकिस्तानसोबतची परराष्ट्रमंत्री स्तराची चर्चा रद्द केली असतानाच, काश्मीरच्या मुद्दय़ावर ‘प्रत्येकाशी’ चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. मात्र, काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद हा ‘पाकिस्तानपुरस्कृत’ आहे, यावर त्यांनी जोर दिला.

काश्मीरचा प्रश्न सुटेल असे मला वाटते. आम्ही प्रत्येकाशी बोलण्यास तयार आहोत, असे मध्य क्षेत्रीय परिषदेसाठी येथे आलेल्या राजनाथ यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाबाबत सर्व सुरक्षा संस्था समन्वयाने काम करीत आहेत. काश्मीरमधील दहशतवाद पाकपुरस्कृत आहे, असे ते म्हणाले.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होईल, असे भारताने सांगितले होते.

मात्र, जम्मू- काश्मीरमध्ये तीन पोलिसांची निर्घृण हत्या आणि पाकिस्तानने काश्मिरी दहशतवादी बुऱ्हान वानी याच्या ‘उदात्तीकरणासाठी’ काढलेली टपाल तिकिटे या कारणांमुळे या घोषणेनंतर २४ तासांच्या आत भारताने ही बैठक रद्द झाल्याचे जाहीर केले होते.