तुमच्या समाजमाध्यम प्रोफाईलविरुद्ध कारवाई करण्याची कायदेशीर विनंती भारताच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी आपल्याला केली असल्याचे ट्विटरने लोकप्रिय राजकीय व्यंगचित्रकार मंजुल यांना कळवले आहे. कंपनीकडून मिळालेला ई-मेल मंजुल यांनी शुक्रवारी शेअर केला.

‘या विनंतीच्या आधारे आम्ही सध्याच तुमच्या प्रोफाईलवरील मजकुराबाबत काही कारवाई केलेली नाही’, असे  ट्विटरने सांगितले. मंजुल यांच्या एखाद्या विशिष्ट ट्वीटऐवजी त्यांच्या प्रोफाईलविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सरकारने केली आहे. ते भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.

मंजुल हे वकिलांची मदत घेऊन सरकारच्या विनंतीला न्यायालयात आव्हान देऊ शकतात, काही तोडगा काढण्यासाठी नागरी समाज संघटनांशी संपर्क साधू शकतात किंवा स्वत:हून हा मजकूर हटवू शकतात, असे ट्विटरने त्यांना सुचवले आहे.

‘जय हो मोदी जी की सरकार की’, असे मंजुल यांनी ट्विटरवर लिहिले. आपल्या कुठल्या ट्वीटमुळे समस्या उद्भवली हे सरकारने लिहिले असते तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.

मंजुल यांनी करोना महासाथीची भीषण अशी भारतातील दुसरी लाट आणि लसीकरणाची धीमी गती यांचे वास्तव चित्रित केले आहे. एप्रिल महिन्यात सरकारच्या आदेशानंतर ५२ ट्वीट्स ट्विटरवरून काढून टाकण्यात आले होते. ते खोट्या बातम्या पसरवत असल्याचा दावा केंद्राने केला होता. मात्र त्यापैकी बहुतांश सरकार करोनाची समस्या ज्या रीतीने हाताळत आहे त्यावर टीका करणारे होते.