माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी नुकतेच देशाच्या आर्थिक विकास वाढीच्या घटलेल्या दरासाठी (जीडीपी) केंद्र सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले होते. मात्र, सरकारने मनमोहन सिंग यांचा हा दावा नाकारला असून त्यांना उत्तर दिले आहे. सरकारने म्हटले, ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी होती. तर आज देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या सर्वाधिक ताकदवान अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.

मनमोहन सिंग यांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की, “आम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विश्लेषणाचे समर्थन करीत नाही. ज्यावेळी मनमोहन सिंग यांच्या सरकारचा कार्यकाळ संपला त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था सर्वात मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांच्या ११ व्या स्थानी होती. मात्र, आता देशाची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानावर असून ती तिसरे स्थान काबीज करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.”

“एक जबाबदार सरकार या नात्याने आम्ही या मुद्द्यावर लक्ष देत आहोत की जीएसटी अधिकाधिक सुलभ व्हावा. त्यासाठी जीएसटी परिषद प्रत्येक महिन्याला बैठक घेते आणि आवश्यक निर्णय घेते त्यामुळे ही प्रक्रिया सुरळीतरित्या सुरु आहे. जनतेचे सरकार अशाच प्रकारे काम करते आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा चमकेल आणि चांगली कामगिरी करेल,” असेही जावडेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनमोहन सिंग यांनी रविवारी देशातील आर्थिक मंदीला थेटपणे मोदी सरकारला जबाबदार धरले होते. त्यांनी म्हटले होते की, “हे मानवनिर्मित संकट आहे जे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाले आहे. जीडीपीचा दर हा ५ टक्के राहिल्याने हे लक्षात येते की, देश सध्या मोठ्या मंदीच्या काळात आहे. भारताकडे वेगाने आर्थिक वाढ करण्याची क्षमता आहे मात्र, मोदी सरकारच्या चहूबाजूंच्या चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली आहे.”

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कमजोर वाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधताना मनमोहन सिंग यांनी म्हटले होते की, “ही वाढ केवळ ०.६ टक्के इतकीच राहिली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, आपली अर्थव्यवस्था अद्याप नोटाबंदीसारख्या मानवनिर्मित चुकांमुळे उभी राहू शकत नाही. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे देखील अर्थव्यवस्थेची स्थिती खराब झाली आहे.”