न्या. नरिमन यांची सूचना

शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ३-२ बहुमताने जो निकाल दिला त्यामधील मतभेदाची अत्यंत महत्त्वाची बाजू सरकारने जाणून घ्यावी, असे न्या. आर. एफ. नरिमन यांनी शुक्रवारी येथे सांगितले. न्या. नरिमन यांनी स्वत:च्या आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या वतीने गुरुवारी मतभेद असलेला आदेश दिला.

शबरीमालाप्रकरणी मतभेद असलेला देण्यात आलेला निकाल कृपया सरकारला जाणून घेण्यास सांगावे, कारण तोही तितकाच महत्त्वाचा आहे, असे न्या. नरिमन यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले.

शबरीमाला प्रकरणाची पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली, न्या. नरिमन आणि न्या. चंद्रचूड हे त्या पीठातील सदस्य होते. बहुमताच्या निकालाबाबत त्यांनी आपले मतभेद नोंदविले. शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी करण्यात आलेली याचिका त्यांनी फेटाळली.

शबरीमाला हे चळवळीचे ठिकाण नाही – सुरेंद्रन

तिरुअनंतपूरम : शबरीमाला हे चळवळीचे ठिकाण नाही, केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी जे मंदिरात प्रवेश करण्याची घोषा करतात त्यांना एलडीएफ सरकारने पाठिंबा देऊ नये, असे केरळचे देवस्वममंत्री के. सुरेंद्रन यांनी म्हटले आहे. शबरीमाला मंदिरात जाण्याचा ज्या महिला प्रयत्न करतील त्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचे वृत्त सुरेंद्रन यांनी फेटाळले, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालाबाबत संभ्रम असल्याचे ते म्हणाले.